“मिळून आपण सारे” - (नाटिका)

“मिळून आपण सारे” - (नाटिका) 

पात्र योजना – विविध प्राणी – सिंह, वाघ, कोल्हा, हत्ती, बिबट्या, मोर, हरीण, ससा. शक्य असेल तर मोर, हरीण, ससा, माकड प्रत्येकी दोन दोन घेणे, actions बसवताना अधिक co-ordination करता येईल  graceful दिसेल. झाडे, माणसे (झाडे माणसे उपलब्धतेप्रमाणे घ्यावीत फक्त जंगलदृश्य वाटले पाहिजे इतकी झाडे माणसे त्यांच्या प्राण्यांच्या लढाईचे दृश्य परिणामकारक दिसेल इतकी असावीत. )

पडदा उघडतो तेव्हा स्टेजवर विखुरलेल्या पद्धतीने झाडे उभी असतील गाण्याच्या तालाप्रमाणे  फांद्या हलवल्याप्रमाणे हातांच्या हालचाली करतील.

गाणे सुरवातविंगेमधून, गाणे चालू होत असतानाच सूत्रधार म्हणजेच माकडाचा उड्या,कोलांट्या मारत एकीकडे गाणे म्हणत प्रवेश एकीकडे तालावर सर्व प्राण्यांचाही प्रवेश आणि मोकळेपणाने सगळीकडे फिरणे ओळीनुसार त्या त्या प्राण्याला त्या प्राण्याचे वैशिष्ट्य लक्षात येईल अशी action करायला सांगणे. इतरांनीही ओळीच्या अर्थाला अनुसरून action करणे. माकडं झालेल्या मुलांची संख्या जास्त असावी निवेदनाचे काम त्यांना वाटून द्यावे. )

आमच्या आनंदवनात, आनंदवनात किती किती आनंद,

कितीही खेळा, कसेही खेळा, नाही कसला निर्बंध.

सिंह आमचा राजा, कल्याणकारी राजा,

प्रधान कोल्होबा साथीला, खूष राही प्रजा.

शूर, ताकदवर वाघोबा आहे सेनापती,

इथे नांदते शांती, कसलीच नाही भीती.

गृहमंत्री गजराज, घेती काळजी सगळ्यांची,

कला मंत्री मयूरी, संस्कृती जपती जंगलाची

इथे नांदते शांती, मैत्री, भांडणं कोणातच नाही,

आनंदवनासम जागा कुठेच मिळणार नाही.”

आमच्या आनंदवनात, आनंदवनात किती किती आनंद,

कितीही खेळा, कसेही खेळा, नाही कसला निर्बंध.

सूत्रधार (माकड) – अरे या, या, खूप दिवसांनी पाहतोय तुम्हा माणसांना आमच्या या आनंदवनात. त्या प्रसंगानंतर माणसं इथे यायला जरा घाबरायला लागलीयेत, झाडे तोडायला तर नाहीच, पण वनातले पदार्थ गोळा करायला नाही अहो, साधे सहलीला देखील नाही. का? का काय विचारताय? विसरलात का तुमचं आमचं छोटेखानी युद्ध? थांबा हं,आठवून देतो तुम्हाला. (flashback)

(एकीकडे प्राण्यांनी सभेच्या पद्धतीने बसणे व कवितेच्या ओळींनुसार अभिनय करणे )

जंगलातील प्राण्यांची सभा भरली,

सगळ्यांच्या मनात होती काळजी दाटली.

राजा सिंहासह सगळे पडले होते विचारात,

करायचे कसे, आता ह्या प्रश्नाशी दोन हात?

प्रश्न होता साऱ्यांच्या जीवनमरणाचा,

गेली दोन वर्ष कमी पडणाऱ्या पावसाचा,

“ कारणे शोधा,कारणे शोधा ” ,

फतवा काढत सिंहाने मोठी डरकाळी फोडली.

भीतीने सगळ्यांची कशी घाबरगुंडी उडली.

आणली बातमी पोपटाने,जंगलच्या हेराने,

‘तोडतायत किती झाडे, माणसे विचार न करता,

जाताहेत ढग जंगलावरून सरळ पाऊस न देता’.

सगळे प्राणी संतापले, आरडाओरडा करू लागले.

कोल्होबा – ‘ एकजूट होऊ या,

येणार नाहीत जंगलाकडे ते,असे काही करू या’ .

बिबट्या – ‘ मी जातो शहरात आणि घाबरवतो त्यांना’

गजराज  ‘ सीमेवर जाऊ सगळेजण,तिथेच रोखू त्यांना’.

कोल्होबा  ठरले तर मग , लागा तयारीला,

थेट भिडून प्राण्यांनी, धाडले माणसांना पिछाडीला,

(इथे माणसे व प्राण्यांचे एकमेकांना भिडणे, थोड्या युद्धासारख्या हालचाली, माणसांचे पळून जाणे व पुढील ओळी चालू असताना प्राण्यांचे पूर्ववत सभेसारखे बसणे ) 

कुशल नेतृत्व वाघोबाचे, अनोखे कर्तृत्व साऱ्यांचे

तेव्हापासून इथे कोणी येत नाही, आम्हाला त्रास देत नाही.

आमचे आम्ही मजेत रहातो, दुख्खाला अजिबात वाव नाही’.

आमच्या आनंदवनात, आनंदवनात किती किती आनंद,

कितीही खेळा, कसेही खेळा, नाही कसला निर्बंध.

पण आज पुन्हा एकदा सभा भरलीय. पावसाचे प्रमाण अजून पूर्वीइतके वाढलेले नाही, आतापर्यंत एवढे जाणवत नव्हते, पण आता पाण्याचं दुर्भिक्ष्य फारच वाढलंय. काय उपाय करायचा हे ठरवण्यासाठी आहे ही सभा.

( सभेत जाऊन बसतो)

सिंह – प्रधानजी, कामकाजाला सुरवात करा. 

कोल्हा  महाराजांचा विजय असो. आपल्या सर्वांना आठवत असेलच,काही वर्षांपूर्वी आपल्याला मिळणाऱ्या कमी पावसाचे कारण म्हणजे माणसांनी केलेली वृक्षतोड. म्हणून आपण त्यांना जंगलात झाडे तोडण्यासाठी आत यायला मज्जाव केला. काही दिवस पावसाचे प्रमाण वाढले नाही तरी आपल्याला पाणी कमी पडले नाही. पण आता पाण्याचं दुर्भिक्ष्य जाणवायला सुरवात झालीय. त्यावर काय उपाय करता येईल, हे ठरवण्यासाठी आपण इथे जमलो आहोत. तेव्हा सगळे मिळून ठरवू या. गृहमंत्री गजराज, तुमचे काय मत आहे?

हत्ती – परत माणसांनी झाडं तोडायला सुरवात केली आहे का ते पहायला हवं आधी. 

कोल्हा – याबाबत आपले गुप्तहेर आपल्याला सद्यपरिस्थिती सांगतील.

पोपट- महाराजांचा विजय असो. महाराज, माणसांनी आपल्या जंगलातील वृक्षतोड थांबवली तर आहेच,पण त्यांना आता पाण्याची टंचाई जाणवायला लागल्याने त्यांनी झाडं लावायलाही आता सुरवात केली आहे.

हरीण– आता ते आपली शिकार करायला तर येत नाहीच, उलट आम्ही कधी दिसलो तर फोटो काढतात.त्यांना खूप आनंद होतो आम्हाला पाहून.

मोर–हो आणि आम्ही जिथे नेहमी जातो तिथे पाणी आणि धान्य पण ठेवतात.

माकड– आम्हाला पण केळी देतात.

हत्ती– आपण इथे माणसांची स्तुती करायला जमलो आहोत का?

वाघ- नाही,पण एवढं खरं की आता ते आपल्याशी शत्रूसारखे वागत नाहीत तर आपली काळजी घेतात, मधे माझा भाऊ विहिरात पडला तर त्याला त्यांनी त्यातून खूप छान बाहेर काढलं आणि जंगलात पाठवून दिलं.

ससा–एक मात्र मान्य करायला हवं की माणसं खूप हुशार आहेत. त्यांनी पाणी वाचवायचेही वेगवेगळे उपाय शोधून  काढले आहेत.

सिंह–प्रधानजी, यावर आपले काय म्हणणे आहे? 

कोल्हा – महाराज, आता आपण पण माणसाशी शत्रूसारखे न वागता त्यांनी त्यांच्या बुद्धीच्या जोरावर कोणते उपाय केले आहेत ते पाहू या. व त्यातले आपण काय करू शकतो त्याचा विचार करू या. कोण सांगू शकेल काय काय उपाय त्यांनी केले आहेत?

ससा- त्यांनी तलाव बांधले आहेत, नदीचे पाणी अडविले आहे, धरणे बांधली आहेत.

बिबट्या– धरणापासून कमी पाणी असणाऱ्या भागाकडे जाणारे कालवे काढले आहेत.

सिंह- अरे वा ! खूपच हुशार दिसतायत माणसं! आपल्याला काय करता येईल प्रधानजी? 

कोल्हा – आपणही काही उपाय करू शकतो. सगळे मिळून एकत्र कामाला लागलो तर आपणही हे करून दाखवू शकतो.

हत्ती–पण आणखी महत्वाचं म्हणजे,पाण्याचा वापर जपून करा , पाणी वाया जाऊ देऊ नका.

मोर– वापरायचे पाणी आणि पिण्याचे पाणी एकत्र ठेऊ नका. सर्व पाण्याचा योग्य पद्धतीने,पाहिजे असेल तेव्हाच आणि तेवढाच वापर करा.

सिंह –अगदी बरोबर. मला वाटतं, प्रधानजी, योग्य योजना तयार करा आणि होऊन जाऊ दे कामाला सुरवात!

सगळे– वनराज सिंह महाराज की जय! वनराज सिंह महाराज की जय!

( सगळे उठतात आणि  कामाला लागतात, प्राण्यांचे शक्य असतील तेवढे गट करून प्रथम वेगवेगळ्या भागात गोलाकार फिरत तलाव बांधल्याच्या  actions – एकीकडे गाणे – ‘सेतू बांधा रे  सागरी’ च्या चालीवर -

कालवा बांधा रे, कालवा बांधा रे, कालवा बंधारे वनी, कालवा बांधा रे वनी ! वनराज सिंहराज की जय! वनराज सिंह महाराज की जय!

नंतर स्टेजच्या मागच्या भागात नदीला बांध घातल्याच्या actions, गाणे – साथी हाथ बढाना साथी रे,एक अकेला थक जायेगा, मिलकर बोझ उठाना , साथी हाथ बढाना साथी रे!

धरणापासून कालवे खणण्याच्या actions, दोन वेगवेगळ्या दिशांमधून – गाणे – चले चलो (लगान मधील गाणे)

प्रत्येक गाणे कमीत कमी दोनदा, किंवा करत असणाऱ्या actions मधून काय चालले आहे ते स्पष्ट होईपर्यंत.

कालव्याच्या actions लांबपर्यंत आल्या म्हणजे कालवे काढणे चालू असतानाच स्लोगन्स लिहिलेली पोस्टर कार्ड्स घेऊन काही प्राणी नाचत येतील एकेक करून  स्टेज वर येतील, स्लोगनचा पहिला भाग कार्ड हातात घेतलेला म्हणेल, पुढचा भाग सर्वांनी म्हणायचा आहे.

स्लोगन 1 पाणी नाही, पाणी नाही, आम्हां प्राण्यांचे जीवन नाही.

स्लोगन 2 –जलसंधारण करू या, जीवन समृद्ध बनवू  या.

स्लोगन 3 –थेंब जीवनाचा, थेंब अमृताचा , वाचवा प्रत्येक थेंब पाण्याचा.

स्लोगन 4 –थेंब थेंब साठवूया , गवतझाडांना जगवूया.

स्लोगन 5 –योग्य वापर पाण्याचा, जीव जगेल प्राण्यांचा.

 सगळ्या स्लोगन दोनदा तरी घ्याव्यात. शेवटच्या स्लोगनच्या वेळी हळू हळू सगळे एका रांगेत समोर तोंड करून उभे राहतील ते उभे राहीपर्यंत परत सर्व स्लोगन्स.

सगळे उभे राहिले की सर्वांनी म्हणायचे आहे,

मिळून सारे आपण, एकत्र येऊ या,

 सगळ्या संकटांवर मात करू या!’

 ‘वनराज सिंह महाराज की जय ! वनराज सिंह महाराज की जय!

“आमच्या आनंदवनात, आनंदवनात किती किती आनंद,

कितीही खेळा, कसेही खेळा, नाही कसला निर्बंध, नाही कसला निर्बंध, नाही कसला निर्बंध!

‘वनराज सिंह महाराज की जय !

(पडदा पडेपर्यंत म्हणत रहाणे) - ‘वनराज सिंह महाराज की जय !

(प्रयोग करण्यासाठी लेखकाची  पूर्वपरवानगी घेणे आवश्यक)

ज्योतीG (jyotigandhe28@gmail.com)

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा