प्रभाव
नमस्कार, आपल्या सर्वांच्या मनात खूप काही गोष्टी येत असतात, कीतीतरी गोष्टींवर आपण विचार करतो. गोष्ट,कविता,लेख अशा अनेक कितीतरी माध्यमातून आपण त्या मांडायचा प्रयत्न करतो,पण ते कोणालातरी आपण दाखवलं, हल्लीच्या भाषेत share केलं की आपल्याला जास्त छान वाटतं.त्यांच्याकडून दाद मिळाली,चर्चा झाली की आपल्याला जास्त उत्साह येतो आणि आणखी नवीन,नवीन छान सृजनशील असं लिहावसं वाटतं.
आणि म्हणूनच हा एक प्रयत्न मी करते आहे. आपले विचार हे जरी स्वतंत्र असले, तरी कोणाचातरी त्यावर प्रभाव असतो. काहीवेळेला आपल्याला ते कळत, काहीवेळेला आपल्याला ते जाणवत देखील नाही. हे खूप personal असतं पण ते जाणवलं की त्या व्यक्तीला ‘thank you’ म्हणावसं वाटतं. माझ्यावर ज्या व्यक्तीचा प्रभाव पडलाय तिला thank you म्हणावसं वाटतंय सुरवात करताना.....
स्वभावतः मी खरं म्हटलं तर फारशी न बोलणारी,पण लिहावसं मात्र वाटायचं आणि कविता,गोष्ट,पथनाट्य,एकांकिका या माध्यमातून विविध निमित्तानी खूप काही लिहिलं खरं पण त्यातलं फारच थोडं आता माझ्याकडे आहे.
जेव्हा माझं काही लिखाण इतरांना दाखवलं आणि त्याचं जेव्हा कौतुक झालं तेव्हा हे मी कसं लिहू शकले याचा विचार मनात यायला लागलं, आणि माझ्या लक्षात आलं की फक्त लिखाणावरच नाही, तर आपण लहान असताना नाही जाणवलं पण मोठं झाल्यावर आपण जे करतो,जे बोलतो, किंबहुना आपण जे विचार करतो, आपल्या पूर्ण व्यक्तिमत्वावर नकळत आपल्या आईचा प्रचंड प्रभाव झालेला आहे.म्हणून पहिला भाग आईलाच समर्पित!
आई,तुझं नसणं,तुझं असणं ...
वत्सलेची निर्मिती तू,वात्सल्यमूर्ती तू,
आमची आई तू,व्हायचीस कोणाचीही आई तू,
मलूल चेहेऱ्यावर,हास्य आणण्यासाठी व्याकूळ
व्हायचीस तू,
अन स्वतःतच रमणारी मी,
कोणाशी फारसं न बोलणारी मी,
बोलणंसुद्धा नव्हतं,मग जाणणं तर फारच दूर,
पण तू भिनलीस माझ्यात,आईपण घ्यायलाही शिकवलस,
आणि दाखवलीस त्यातली कृतार्थताही ...
विलक्षण बुद्धीवैभव तुझं,शिकवताना खिळवून
ठेवण्याचं कौशल्य तुझं,
हातचं काही न ठेवता,मुक्तहस्ते उधळून टाकायचं
व्रत तुझं.
अभ्यासही स्वप्नासारखा करणारी मी,
आभासातच रंगून जाणारी मी,
पण तू शिरलीस माझ्यात आणि कोरलंस,
माझ्यातून एक कष्टाळू,प्रामाणिक,अभ्यासू
शिक्षकाचं शिल्प तू.
साहित्य साम्राज्याची अनभिषिक्त सम्राज्ञी तू,
कविता,नाटक असे अनेक अनमोल दागिने अंगावर
मिरवणारी तू.
तुझ्या दरबारात रांगताही न येणारी मी,
तरी अडखळतच काहीतरी प्रयत्न करणारी मी,
‘हे ‘मी’ लिहिलंय?हे ‘मला’ सुचलंय?’
असा मलाच प्रश्न विचारणारी मी,
पण मला माहितेय ,
तूच माझ्या मनात,विचारात,बोटात सरस्वती होऊन
येतेस,
माझ्याकडून विलक्षण काहीतरी लिहून घेतेस.
आई, मला जेवढं रडवत न, तुझं आमच्यात नसणं,
तेवढंच मला सुखावतं असं तुझं ‘माझ्यातलं’ असणं.
.... असं तुझं ‘माझ्या आतलं’ असणं.
ज्योतीG (jyotigandhe28@gmail.com)

लेखनातून आईचा प्रभाव कळतोय पण शिक्षिका पण डोकावते आहे .
उत्तर द्याहटवाthank you,मंगेश!
हटवाज्योती मधुरवच्या द्वारा कळल होत की तुझी आई पण लेखन करायचीआणि खरच ते अलगद तुझ्यातही उतरले आहे.कविता छान झालीय.कथा
उत्तर द्याहटवानकळत संस्कार करणार्या आहेत.तुझ्या लेखनप्रवासाला खूप शुभेच्छा.
खूप धन्यवाद,मृदुला,असंच लेखायतन वाचत रहा आणि प्रतिक्रिया देऊन उत्साह वाढवत राहा.
हटवा