गुड टच

गुड टच 

नावावरून कदाचित वाटलं असेल की मी आता या गंभीर विषयावर बरंच काही गंभीरपणे बोलणार आहे,विषय खूप महत्वाचा नक्कीच आहे,अतिशय गंभीरपणे बोलण्यासारखाही आहे, विचार करण्यासारखाही आहे,आणि सावधानतेने हाताळण्यासारखाही आहे. अलीकडच्या काळात ह्या बाबतीत अगदी लहानपणापासून मुलींना आपण ह्याची ओळख आणि जाणीव करून देतो.मला आठवतंय, आमीर खानच्या ‘सत्यमेव जयते’ ह्या कार्यक्रमापासून ह्या विषयावर जास्त चर्चा होऊ लागली. स्वानंद किरकिरे यांनी लिहिलेल ‘ओ री चिरेईया.’ हे गाणं आठवलं तरी गलबलल्यासारखं होतं.

मला खूप वेळेला वाटतं, ‘पालकत्व’ हे कधीच सोपं नव्हतं. पण आम्ही लहान असताना आई वडील, वडिलधारे बरोबरच बोलत आहेत, ते म्हणतात तसं आपण वागलं पाहिजे, एवढं साधं सरळ सोपं होतं. हं,आमच्या पिढीतही आईवडिलांचा राग यायचाच, मनात धुसपूसही असायची, त्यांच्याबद्दल तक्रारही असायचीचं. पण आदरही खूप असायचा त्यामुळे त्यांचं ऐकलं जायचं, त्यामुळे कदाचित आयुष्य सरळ वाटायचं.

आम्ही पालक झालो, तेव्हा आम्हाला एक किंवा दोन मुलं, स्त्रिया थोड्याअधिक प्रमाणात अर्थार्जनासाठी बाहेर पडू लागलेल्या.आम्ही मुलांशी अधिक संवाद साधू लागलो. आम्ही मुलांची आमच्या मते अधिक काळजी घ्यायला लागलो. पण तरी प्रवास बऱ्यापैकी सरळ होता. आम्ही तर चिपळूणसारख्या छोटया शहरात होतो, मी कॉलेजमधे सर्व्हिस करत होते गाव छोटं होतं. जवळ जवळ सगळे एकमेकांना ओळखत होते. खूप सुरक्षित वाटायचं, किंबहुना काही मनातच यायचं नाही.

पण आता चित्र बदललंय, आता दुकानातून काही आणायला सांगतानाही धास्तावल्यासारखं होतं. मुलगी घरी येईपर्यंत मन अशांत असतं. आणि आता तर खरी मुलींनी गगनात झेप घ्यायला हवी आहे, पालकांपुढे असणारी आव्हाने खरंच खूप मोठी आहेत. म्हणून आपण मुलीना सक्षम. अधिक बोल्ड, बिनधास्त, आत्मविश्वासपूर्ण बनवत आहोत.बरोबरच आहे ते. पण मी थोड्या वेगळ्या दृष्टीनी बोलायचं ठरवलं आहे.

आपण आज मानसशास्त्राचाही अभ्यास करतो आहोत. मुलांच्या वाढीच्या अवस्थांचा अभ्यास करतो आहोत. मुलांच्या आणि मुलींच्याही वाढीच्या अवस्था असतात, त्यांच्यातही शारीरिक आणि मानसिक असे बदल होत असतात. मुलीही वाढत्या वयात वेगळ्या वागायला लागतात, हट्टी होतात.त्यांना हवं तेच करायच्या मागे असतात, आरशासमोर तासनतास उभ्या रहातात, स्वतःच्या दिसण्याबद्दल फारच काटेकोर होऊ लागतात, अस्वस्थही होऊ शकतात, त्यांच्याकडूनही चूक होऊ शकते. ह्याचाही आपण विचार करायला हवा. म्हणून आपण त्यांच्याशी संवाद साधायला हवा आहे, आपण तो प्रयत्नही करू लागलो आहोत. खरं म्हटलं तर मुली आणि मुलांशीही असा संवाद व्हायला हवा. संवाद तर पाहिजेच, आपल्याशी मुलांनी मोकळेपणाने बोलायला हवंच आहे. एवढेच नाही तर त्यांना आपल्याशी बोलावेसेच वाटले पाहिजेअगदी एखादी चूक त्यांच्या हातून घडली असेल तरीही. त्यांना आपल्याला सांगितल्याशिवाय चैनच नाही पडता कामाकोणत्यातरी पद्धतीने त्यांनी आपल्याला जाणवून द्यायला हवंय. त्यांच्याकडून चूक झालेली असली तरी आपण त्यांच्याबरोबर, त्यांच्या पाठीशी आहोत एवढा विश्वास त्यांच्या मनात आपण निर्माण करू शकलो तर पुढे होणाऱ्या किंवा होऊ शकणाऱ्या अनर्थापासून आपण त्यांना वाचवू शकू. हे सांगण्यासाठी ही गोष्ट, जी कोणाच्याही आयुष्यात घडलेली असू शकते, आणि त्यात त्यांची चूकही नसू शकते, महत्वाचं आहे ते, त्याची वेळेवर जाणीव होणे आणि त्यातून वेळेवरच बाहेर पडणे. पहा, पटतंय का?

गुड टच

उद्या आपला इंटर्व्हियु. आपल्या कॉलेजच्या कॅम्पस इंटर्व्हियुची पहिली राउंड. इन्फोसिस, विप्रो, कॉग्निझन्टअशा कितीतरी कंपनीज येणार आहेत. अभ्यासावर आधारित प्रश्नांचं काहीच टेन्शन वाटत नाहीये. पण ड्रेस काय घालू? आपलं फर्स्ट इम्प्रेशन छान पडलं पाहिजे. मनात आलं. आपण’ हा विचार का करतोय? आपलं इम्प्रेशन छानच पडतं लहानपणापासून, माहितेय आपल्याला. आईचा गोरा रंग, नुसताच गोरा रंग नाही तर झळाळती स्कीन, म्हणजे असं लोकं म्हणायचे. सिल्की, सॉफ्ट, लांब, किंचित ब्राऊन झाक असणारे दाट केस आणि बाबांची बुद्धी, उंची असं कॉम्बिनेशन असणाऱ्या आपण! आपण कधीच फिकीर केली नाही खरतर याची.पण आज मनात आलं एवढं खरं! स्वतःशीच हसले, आणि कपाटात शोधायला लागले.

हं, ही ब्लॅक ट्राउझर छान आहे, त्यावर शर्ट कोणता, पिंक?, नको, हा व्हाईट? नको. हा स्काय ब्लु?नको, ह्याचं लस्टर जरा कमी वाटतंय. हा क्रिम? हं, हा छान आहे, ह्याची फॅशनही छान आहे. ह्याच्यावर ब्लॅक डिसेंट प्रिंट असलेला स्ट्रोल घेऊ या का? साईडला टायसारखी नॉट बांधून? बघूया कसं वाटतंय? अरे पण गेला कुठे तो? सापडेच ना. शोधता शोधता, हे काय लागतंय हाताला? ओ, ही आपली special box? त्यात होतं मोरपिस. मोरपिस पाहिलं की सरांची आठवण येते तशी आताही सरांची आठवण आली. नववीत होतो आपण.

नववीत मॅथ्स शिकवायला नवीन सर आले. शुभंकर भारद्वाज नावापासून, दिसणं, शिकवणं, बोलणं, सगळंच विलक्षण! मला तेव्हाही माहीत होतं, हुषार माणसांना हुशारीचच कौतुक असतं. मॅथ्स चांगलं होतंच माझं, पण आणखी, आणखी मॅथ्सचाच अभ्यास करू लागले आणि अर्थात युनिटटेस्टमधे टॉपर आले. पेपर दाखवताना सरांनी खूप कौतुक केलं पेपरचं. मग काय? मी एकदम हवेत. त्यादिवशी शिंदे टीचरनी बोलावलं म्हणून स्टाफरुम मधे गेले, भारद्वाज  सर तिथेच होते, टीचर त्यांना म्हणाल्या, “ सर, हिची ओळख झाली की नाही? ही आपली सरस्वती, म्हणजे गॅदरिंगमधे प्रार्थनेच्या वेळी हीच सरस्वती असते.”

“त्यांच्या नावातच सरस्वती आहे न?  आणि प्रत्यक्षातही सरस्वतीचा आशीर्वाद आहे त्यांना.”

सर मला ‘अहो’  म्हणत होते, आणि मला कळलं होतं की माझ्या मॅथ्सच्या मार्कांबद्दल ते बोलत आहेत पण माझं ‘इरा नावही त्यांना माहित आहे? हे पाहून मला खूप छान वाटलं.

तिथून घरी जात असताना अमोल भेटला. शाळेचा हिरो. सारखा माझ्या मागे मागे असायचा, त्याने मला थांबवलं, “इरा, सांग ना, माझी फ्रेंडशिप एक्सेप्ट करशील ना? काय प्रॉब्लेम आहे? कितीवेळा विचारलं, सांग ना, “ खरंच अमोलनी हे तिसऱ्यांदा तरी विचारलं असेल. त्याला काय उत्तर द्यायचं हे कळत नव्हतं. पण मनात म्हटलं,आज बोलून टाकू.

“अमोल, तसे आपण मित्र आहोतच, पण तू पुन्हा, पुन्हा विचारतोस म्हणून सांगते. तू म्हणतोस तशी फ्रेंडशिप मात्र मी नाही करू शकणार, एकतर माझ्या मनात असंं काही येत नाही. दुसरं म्हणजे ह्यासाठी आपण लहान आहोत, मोठे होऊ, काहीतरी बनू आणि मग ठरवू आपल्याला काय वाटतंय ते. नाराज नको होऊस, आपण मित्र राहणार आहोतच.”  जे जे सुचलं, ते ते बोलत गेले. मोठ्या माणसांसारख बोलले खरे. पण हे शहाणपण नंतर कुठे गेलं कोणास ठाऊक? सारखे सरांचे विचार मनात यायला लागले. त्यांच्याकडे पाहत रहावं, काही तरी निमित्त काढून त्यांच्याशी बोलावं वाटायला लागलं. दुपारच्या वेळेला वर्गात एक उन्हाची तिरीप येत असे, त्यात तर सर एकदम चमकताना दिसले, त्यात एक वाऱ्याची झुळूक आली, आणि सरांचे रेशमी केस एकदम भुरभुरले, मी नुसती त्यांच्याकडे पाहत राहिले. आणि मग मला तो नादच लागला. नुसतं सरांकडे पाहत रहावसं वाटे, त्यांचं बोलणं, शिकवणं कुठेच लक्ष लागायचं नाही.

आदल्या वर्षी मोरावर बसलेली सरस्वती केली होती, तेव्हाच एक पीस होतं माझ्याकडे. माझ्या मनात आलं हे सरांना देऊ, मग सरांना कळेल मला काय वाटतं ते. म्हणून आईचा नेकलेसचा एक बॉक्स घेतला, त्यात एक छान गुलाबी कागद घातला, आणि त्यावर ते मोरपिस ठेवलं. बॉक्सच्या मापानी एक ग्रीटिंग तयार केलं, त्यावर लिहिलं “To Sir, with love!”

पण ते कधी द्यायचं हे मात्र सुचत नव्हतं. दुसरी युनिट टेस्ट झाली, मी काय केलं होतं मला काहीच आठवत नव्हतं. सरांनी न बोलता मला पेपर दिला. मी पाहिला मात्र आणि खाडकन कोणी तरी थोबाडीत द्यावी असं मला झालं. मी चक्क नापास होते. मला खूप रडू यायला लागलं. सरांना सॉरी म्हणावंसं वाटायला लागलं. त्यांना भेटावंसं वाटायला लागलं, त्यांच्याजवळ जाऊन खूप रडावं असंही वाटायला लागलं. शाळा सुटेपर्यंत मी कशीबशी थांबले.स्टाफरुम मध्ये गेले, कोणीच नव्हतं तिथे. मी सरांजवळ गेले, खूप जवळ आणि रडत रडतच ‘सॉरी, सर” म्हणत राहिले. सरांना काही कळत होतं की नाही, काही माहीत नाही, पण मी मात्र नकळत सरांच्या आणखी, आणखी जवळ जात होते. मला जणू दुसरं काही उमजतच नव्हतं. अचानक एकदम जाणवलं, सर पाठीवर थोपटत आहेत आणि म्हणतायत, “शांत हो,इरा, शांत हो!”

मला एकदम जाणवलं, हा स्पर्श मला समजून घेतोय, हा स्पर्श खूप काळजीचा स्पर्श आहे, मला म्हणतोय, “just Be calm, समजतंय मला, शांत राहा.!” बस, फक्त मला थोपटत राहिले, मी एकदम भानावर आले, जशी काही कुठल्यातरी झोपेतून जागी झाले, सरांकडे पाहिलं, तर त्यांनी नुसतं smile दिलं. आणि दिलासादायक मान हलवली.

मी तिथून पळत सुटले आणि माझ्या खोलीत दार बंद करून किती वेळ कोणास ठाऊक रडत राहिले. बऱ्याच वेळानी शांत झाले, आणि फ्रेश होऊन बाहेर आले आणि आईच्या मांडीवर नुसतं डोक ठेऊन पडून राहिले. आई डोक्यावर थोपटत होती. काही बोलत नव्हती पण मला कळत होतं. ती म्हणत होती, “शांत हो,राजा,शांत हो,समजतंय मला,मी आहे तुझ्याबरोबर!” तसाच स्पर्श, हो, अगदी तसाच, धीर देणारा पण आपल्याला काही दोष न देता शांत करणारा स्पर्श! तो स्पर्श जाणवला आणि मी आईला भडभडा सगळं सांगून टाकलं.आईनी मला जवळ घेतलं, “ठीक आहे,बाळा, आता लक्षात आलंय न तुझ्या, होतं असं, आता सांभाळ. आणि अभ्यासाकडे छान लक्ष दे. आणि परत पूर्वीची इरा हो, मस्त, छान हसणारी, सगळ्या गोष्टी मनापासून करणारी.”

नंतर किती तरी दिवस आणि अजूनही मनात येतं,तो स्पर्श ‘good touch’ होता म्हणून, नाहीतर मी स्वतः होऊन पुढे गेले होते, कोणीच नव्हतं आजूबाजूला, काहीही होऊ शकलं असतं. काही झालं असतं तर माझं काहीही भयानक होऊ शकलं असतं. पण मुख्य म्हणजे सरांनी नंतर काही मला जाणवूही दिलं नव्हतं. मला मात्र सरांशी बोलताना अपराधी वाटायचं.

मोठी झाल्यावर आई ‘होतं असं’ का म्हणाली ते जास्त व्यवस्थित कळल, मराठीमधे नकळत्या वयातलं त्या तशा वाटण्याला  ‘गाढवी प्रेम’ म्हणतात त्याला.  इंग्लिशमधे या भावनेसारखाच गोड शब्द आहे ‘calf love’.पण तो खरतर ‘शुध्द गाढवपणाच’ असतो.

पण त्यानंतर मी ठरवलं, आई म्हणाली तसं आता फक्त अभ्यासावरच लक्ष केंद्रीत करायचं. आणि त्याप्रमाणे मी वागले, तो good touch मला कितीतरी वेळा जाणवायचा, आणि प्रेरणा द्यायचा. दहावी,बारावी,सगळ्या परीक्षा अगदी लीलया पास झाले, आणि मला माहितेय मी ही इंजिनीरिंगची, फायनल सुद्धा मी ‘flying colours’नीच पास होणार आहे.

उद्याच्या कॅम्पस इंटर्व्हियु मधे हमखास सिलेक्शन होईल अशा कॉलेजच्या ‘top ten’ मधे मी आहे. आणि माझ्या वरचा हा विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवणार आहे. त्या बॉक्स मधल्या मोरपिसाला मी ‘thank you’ म्हटलं आणि नेहमीच्याच आत्मविश्वासानी उद्याच्या तयारीला सुरवात करण्यासाठी उठले. 

ज्योतीG (jyotigandhe28@gmail.com)

टिप्पण्या

  1. खूप छान... त्या वयातल्या अलवार भावना अगदी हळूवार टिपल्या...

    उत्तर द्याहटवा
  2. अत्यंत नाजूक विषय. सगळ्यांना असे बरे वाईट अनुभव येतात. नशीब चांगले असेल आणि पालक समजूतदार असतील तरच ह्या वयात सावरता येते अन्यथा आयुष्य वाया जाऊं शकते. खूप छान लिहिले आहे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा