वनराणी- एकपात्री प्रवेश


वनराणी

वनराणी – ( गात,नाचत येते,)

 --- मी वनराणी, मी वनराणी,

         आनंदाची गाते गाणी,

         आनंदाची ही धरणी,

        आनंद,आनंदच फक्त या वनी,

इथे आम्ही न खूप मजा,मजा करतो. हे छान घनदाट असं जंगल, हे माझं घर आहे. इथे मी हरणाबरोबर पकडापकडी खेळते, सशाबरोबर धावाधावी, वाघाबरोबर लपाछपी खेळते, माकडाबरोबर सूरपारंब्या खेळते. आणि आम्ही सगळेजण मिळून खांब खांब खांबोळीसुद्धा खेळतो.

येताय तुम्ही? या न, मजा येईल तुम्हाला. आमच्या या जंगलात कशाचीच कमी नाही. इतकी फळं, मुळं, कंदमूळं आहेत इथे खायला, कधी, कधी नं आम्ही ही मुळं, भाजून खातो, इतकी मस्त लागतात.आणि इथल्या नद्या, झऱ्याचं पाणी तर इतकं गोड आहे, की जणू काही अमृत! आम्ही कधी भांडत नाही, कुणी कुणावर चिडत नाही, ओरडत नाही, कुणी रडत नाही म्हणून तर आमचं हे आनंदवन. या तर खरे,

करू या झीन्च्याक झीन्च्याक झिंग, करू या झीन्च्याक झीन्च्याक झिंग,

मस्ती करू या,कुस्ती खेळू या, झीन्च्याक झिंग, झीन्च्याक झिंग, झीन्च्याक झिंग

खेळ खेळू या, खाऊ खाऊ या, झीन्च्याक झिंग,  झीन्च्याक झिंग, झीन्च्याक झिंग,

मज्जा करू या,धमाल करू या, झीन्च्याक झिंग, झीन्च्याक झिंग, झीन्च्याक झिंग,

होss, करू या झीन्च्याक झीन्च्याक झिंग, करू या झीन्च्याक झीन्च्याक, झीन्च्याक झिंग, झीन्च्याक झिंग,

झिंग,झिंग,झिंग झिंग

अरे,अरे एवढं काय आणलंय बरोबर? अरे,अरे, नका, नका नेऊ आमच्या वनराजाला, अरे, हत्तीला का नेताय, अरे वाघोबा काही करत नाही कोणाला, का आणि कुठे नेताय सगळ्यांना?

का, का, का पण झाडं का तोडताय? पक्षी उडाले पहा. आता कुठे जातील ते? अरे पिल्लं पडली न त्यांची.कारे काय करणार आहात तुम्ही झाडं तोडून? इथे रस्ता करायचाय? घरं बांधायची आहेत? कारखाने उभारायचेत? करा न सगळं, पण आमचं सगळं घरच का मोडून टाकताय? आधी झाडं लावा न खूप, मग तोडा,एवढी सपासप झाडं तोडलीत, प्राण्यांना कुठे तरी नेताय, काहींना मारून टाकताय,असं नका न करू. किती किती झाडं तोडली आहेत तुम्ही! एवढी झाडं तोडलीत, आता पाऊसच नाही पडत पूर्वीसारखा, वास किती घाणेरडे येतायत, सगळी जमीन कोरडी होऊन गेली. आता तरी जरा समजून घ्या रे, जागे व्हा रे, फक्त आजचाच नाही उद्याचाही विचार करा.सगळं कसं झकास होतं, भकास करून टाकलंत. उजाड, उदास केलंत रे सगळं. शहाणे व्हा लवकर. कशी रे हवा झाली इथली? मला.. मला .. श्वासच नाही घेता येत, गुदमरून जातेय मी. पण तुम्हाला तरी नंतर मिळणार आहे का शुद्ध हवा,शुद्ध पाणी? काय केलंत रे माझ्या आनंदवनाच,माझ्या नंदनवनाच? आता यापुढे कोणालाच वनराणी नाही दिसणार,तिची आनंदगाणी नाही ऐकू येणार. कधीच नाही दिसणार. मला...मला... खूपच गुदमरायला होतंय. श्वास खूपच कोंडतोय माझा, लवकर जागे व्हा ... (असं म्हणतच कोसळते)

तेव्हा छोट्या दोस्तानो, झाडं वाटेल तशी तोडून आपण आपण किती चुकीचं वागतो आहोत लक्षात आलं न तुमच्या?

हा प्रवेश तुम्हीच करायचा आहे म्हणून ह्याची ऑडीओ नाही केलेली.तेव्हा हा प्रवेश बसवून तर पहा, तुमचं खूप कौतुक होईल. आईची, ताईची कोणाची तरी मदत घ्या पाहिजे असेल तर. पण प्रयत्न तर करून पहा, बाssय!

प्रवेश करायचा असेल तर मला विचारायचं बरं का.खाली दिलेल्या e-mail id वर:

ज्योतीG (jyotigandhe28@gmail.com)

टिप्पण्या

  1. अरे वा काय भारी प्रवेश आहे हा . मला तर लहानपणची आठवण झाली .स्पर्धा . साठी करायला मस्त आहे .

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा