राजकन्येचा हट्ट
( राजकन्या सिमंतिनी नाचत नाचत येते)
सिमंतिनी - मुकूट
माझा जलबिंदूंचा, इंद्रधनुच्या सात रंगांचा... (3 ते 4 वेळा गिरक्या घालत
म्हणते)
आता खूप खूप मजा येणार, महाराजांनी
खूप नाही,नाही म्हटलं तरी शेवटी कबूल केलंच. माझ्यासाठी नवीन मुकूट बनवून
घेणार,म्हणजे घेणारच. मग मी राजकन्या आहे,एकुलती एक तेसुद्धा, अत्यंत पराक्रमी,
प्रजाहितदक्ष,न्यायप्रिय, कनवाळू, दयाळू, मायाळू वगैरे,वगैरे असणाऱ्या महाराज आनंदवर्धन
आणि अतिशय आदर्श, प्रजेवर मायेची पाखर घालणारी,सगळ्यांच्या आनंदात, सुखात,दुख्खात
समरस होणारी, सगळ्यांची मने जिंकून घेणारी महाराणी ईशप्रिया यांची. मग माझे लाड
पुरवायला नकोत?
परवा सकाळी किनई,अशीच मी आमच्या पुष्करणीवर बसले
होते, माझ्या मैत्रिणी मधुलीका, आणि सोनालीका यांची वाट पहात होते,दोघी खरतर आधीच
येतात, पण परवा मी आधी आले, आणि पुष्करणीच्या पाण्यात खेळत बसले,तेव्हा उडणाऱ्या
जलबिंदूत मला इतकं सुंदर इंद्रधनुष्य दिसलं आणि मनात आलं ह्यांचा आपल्याला मुकूट
केला तर? तशीच धावत गेले,आणि आईबाबांकडे मागणी केली,मला जलबिंदूंचा मुकूट करून
द्या.पुष्कळ समजावत होते, मला की असा कसा करता येईल जलबिंदूंचा मुकूट? सोन्याचा करू
या का चांदीचा?हिऱ्यांचा, मोत्यांचा कसलाही करू या. पण मी मुळीच नाही ऐकलं, मला
हवाय,म्हणजे हवाय, म्हणजे हवाच आहे, रडले, हातपाय आपटले, भूक लागली तरी जेवले
नाही. शेवटी त्यांना देतो म्हणावंच लागलं.
आता माझी मजा.
मुकूट माझा जलबिंदूंचा, इंद्रधनुच्या सात रंगांचा,
सोन्याचा नाही की चांदीचा नाही,
हिऱ्यांचा नाही,की मोत्यांचा नाही.
मुकूट माझा जलबिंदूंचा, इंद्रधनुच्या सात रंगांचा.
अस्सा मुकूट नाही कोणाचा,नाही कोणाचा ...
मुकूट माझा जलबिंदूंचा,
इंद्रधनुच्या सात रंगांचा,
हे काय? शिवाकाका, तुम्ही का आलाय
इथे? झाला माझा मुकूट तयार?
शिवाकाका-
ताईसाहेब, महाराजांनी दवंडी पिटवल्यावर खूप जण येऊन गेले मुकूट करायला. खूप सुंदर
नक्षीचा करू म्हणाले,कसलाबी सांगा,लगेच करून देतो म्हणाले,पण जल बिंदूंचा हवाय
म्हटल्यावर सगळे ‘नाही जमणार म्हणून निघून गेले.पण आता एक साधुमहाराज आलेत.ते
म्हणतायत, “मी देतो बनवून.पण माझी अट आहे.”
सिमंतिनी – अट ,कोणती
अट?
शिवाकाका- ते काय बी
ठाव नाय. साधुमहाराज म्हणतात, “राजकन्येसमोरच सांगेन. तिला बोलवा. म्हुनशान तर आलोय
तुम्हाला बोलवायला,चलता न्हव?”
चला की मग, जाऊ या पटापट. (दोघेही
फेऱ्या मारतात, राजकन्या नाचत गात,)
मुकूट माझा जलबिंदूंचा,
इंद्रधनुच्या सात रंगांचा,
सोन्याचा नाही की चांदीचा
नाही, हिऱ्यांचा नाही, की मोत्यांचा नाही.
मुकूट माझा जलबिंदूंचा,
इंद्रधनुच्या सात रंगांचा.
अस्सा मुकूट नाही कोणाचा,नाही
कोणाचा.... मुकूट माझा जलबिंदूंचा, इंद्रधनुच्या सात रंगांचा,
(राजकन्या लाडात,राजाच्या शेजारी
बसते. आणि म्हणते,) “महाराज,हे साधुमहाराज देणार आहेत मला मुकूट करून?”
राजा- हो.पण आधी
त्यांना वंदन करा, सिमंतिनी राजे. (राजकन्या उठून वंदन करते)
राजा- “महाराज,सांगा,आता
आपली काय अट आहे?”
साधुमहाराज- हो,राजकन्ये,तुला पाहिजे तस्सा करून देईन.फक्त
माझी एकच अट आहे, मुकुटासाठी लागणारे जलबिंदू तू आणून द्यायचे,तरच त्याचा मुकूट
होऊ शकतो,नाहीतर नाही होणार.कबूल?
सिमंतिनी –एवढंच न? आता
आणते. (पळत,पळत जाते.हातात जल बिंदू गोळा करते, धावत निघते, पहाते तर त्याचं पाणी
झालेलं असतं, दोनतीनदा करते, रडू लागते,) शी, असं काय होतंय? हातात घेतलं की पाणीच
होतंय त्याचं?मला नाही आणता येत हे जलबिंदू.
साधुमहाराज –राजकन्ये,
जलबिंदू म्हणजे पाणीच असतं न? कुठल्यातरी आघातामुळे पाण्याचे काही कण
उडतात,त्यांना आपण जल बिंदू म्हणतो,आणि त्यातून सूर्यप्रकाश गेला की आपल्याला
त्यात मोहक असं इंद्रधनुष्य दिसतं,पण ते शेवटी पाणीच असतं. आता मला सांग येईल का मग
आपल्याला जल बिंदूंचा मुकूट करता? तेव्हा तुला तुझे सगळे हट्ट पुरवणारे आईबाबा
आहेत, त्यांना ते पुरवावेसे वाटतातही. पण तू जर असे हट्ट केलेस,तर त्यांनाही ते
शक्य होणार नाही हो न? मग काय मिळालं आपल्याला,काही नाही. फक्त,रडारड,समजावण्याचे
खूप प्रयत्न! भरपूर वेळही वाया गेला, आणि कोणालाच काहीच नाही मिळालं. तेव्हा आईबाबा
नेहमी आपलं ऐकतात, आपले सगळे हट्ट पुरवतात, आपल्याला समजून घेतात, मग ते जेव्हा नाही
म्हणतात, तेव्हा आपण नको का समजून घ्यायला?
सिमंतिनी –
हो, महाराज, समजलं मला.आता मी पुन्हा कधी, म्हणजे, कधीच, कध्धीच नाही असा हट्ट करणार.
----------------------------
(एकपात्री प्रवेश असल्याने एकाच
व्यक्तीने सर्व भूमिका करायच्या आहेत फक्त पुष्करणी महाराजाचे सिंहासन ह्याठिकाणी
बसण्याची व्यवस्था करावी.)
सदर प्रवेश हा बऱ्याच वर्षांपूर्वी
मुलांच्या मासिकात आलेल्या एका कथेवर आधारित आहे.
तेव्हा छोट्या दोस्तानो,हा प्रवेश
तुम्हीच करायचा आहे म्हणून ह्याची ऑडीओ नाही केलेली, पण तुम्ही नाही न असा हट्ट
करत?नसालच करत. कारण तुम्ही खूप छान छोटुले, गोडूले आहात.
असेच आणखी पण एकपात्री प्रवेश देणार
आहे. करून पहा,तुम्हाला मजा येईल. तोपर्यंत मजेत रहा, आनंदात रहा, बाssय!
प्रवेश करायचा असेल तर मला विचारायचं बरं का. खाली दिलेल्या e-mail id वर:
ज्योतीG (jyotigandhe28@gmail.com)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा