चेहरा

    प्रत्येकामध्ये काही व्यक्ती वैशिष्ट्ये असतात.काही दार्शनिक,काही आंतरिक. दार्शनिक दिसत असतात,आंतरिक जाणवू शकतात,कधी समजतही नाहीत.पण प्रत्येकाला आपली ही सर्व वैशिष्ट्ये माहीत असतात,त्याबद्दल त्यांचे स्वतःचे असे मत असते.जे वैशिष्ट्य त्यांच्यामधे लोकांच्या दृष्टीने कमी आहे, असं त्यांना वाटतं,त्या बाबतीत ते जरा जास्तच जागरुक असतात.आणि त्यावर त्यांना फार प्रयत्नपूर्वक मात करावी लागते.

आपण दार्शनिक वैशिष्ट्यांबद्दल जास्त संवेदनशील असतो, आणि कळतनकळत त्यावर  भाष्य करतो,आणि त्यांना दुखावतो,आपण विसरतो,पण त्यांना झालेली जखम इतकी खोल असते की ते त्यावर मात करू शकत नाहीत,मात केली तरी विसरू शकत नाहीत,त्याचा त्यांच्यावर,त्यांच्या आयुष्यावर खूप खोल परिणाम होऊ शकतो,ते त्यांच्यात वेगळे गुण असूनही काहीजण स्वतःला विकसित किंवा सिद्ध करू शकत नाहीत,आणि आपल्या ते खिजगणतीतही नसतं.तेव्हा बोलताना आपल्याकडून असं होणार नाही,एवढी काळजी तर आपण नक्कीच करू शकतो.प्रत्येकजण आपआपली लढाई लढत असतो,ती आपल्याला सोपी करता आली नाही तरी अवघड तरी करू या नको,एवढं बंधन तरी पाळू या.

(इथे चेहरा या प्रतीकाचा वापर केला आहे,कारण त्यावर होणाऱ्या कमेंट आणि त्याचं होणारा परिणाम अधिक टोकदार असतो.)  

चेहरा

मला माझा चेहरा आवडत नाही,

इतका की मला तो आरशात सुद्धा बघावासा वाटत नाही.

कोणाशीही बोलताना,माझ्या मनात मला माझाच चेहरा दिसतो,

आणि बोलायचे सारे शब्द तो गिळून टाकतो.

“दिसणं महत्वाचं नसतं, असणं महत्वाचं असतं.

तुम्ही विचार काय करता, दुसऱ्याला कसं समजून घेता

ते महत्वाचं असतं

तुमचं वागणं,तुमचं बोलणं, तुमचं संवेदनशील असणं

हे महत्वाचं असतं.

एक छानसा चेहरा आपल्याला खूप छान समजावून सांगतो,

अगदी मनापासून सांगतो. खरंही असतं ते.

पण त्या चेहऱ्यानी आपल्यासारखं जहरी असं काही बहुदा अनुभवलेलं नसेल ,

कारण नसताना आपल्याला हीन लेखलं जाणं भोगलेलं नसेल .

आपणही कधी असाच सकारात्मक विचार करतो,

पूर्ण ताकदीने लढाया लढतो.

कित्येकदा स्वतःचा ठसा उमटवतो,

दैदिप्यमान,अतुलनीय यशही मिळवतो.

पण तो आवेग ओसरल्यावर,पुन्हा आपलेच होतो,

पुन्हा होतो तिथेच परत येतो.

मग एकदम निराशतो, आतून गळाठतो.

आणि मग दिसतो, जाणवतो आपला चेहरा,

आपल्याला नकोसा, आपलाही नावडता,

बदलता येत नाही म्हणून आपल्याला गोठवणारा,

हतबल करणारा चेहरा.

पण पुन्हा पुन्हा उठायचं असतं.

परत परत लढायचं असतं,

प्रत्येक प्रतलावर आपणच आपल्याला

सिद्ध करायचं असतं.

मग पुन्हा गोळा व्हायचं,उसनं अवसान आणायचं

एका नव्या,अपरिचित क्षणाला सामोरं जायचं.

आपलीच परीक्षा पुन्हा,पुन्हा देण्यासाठी,

जखमी करणारे वार पुन्हा,पुन्हा झेलण्यासाठी.

स्वतःला झोकून द्यायचं,असंच लढत राहायचं

सतत, अविरत, निरंतर .... 

- ज्योतीG (jyotigandhe28@gmail.com)

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा