गिरीजा..
मी सहसा सकाळी फेसबुक बघत नाही पण कसं काय, काय माहीत त्या दिवशी सकाळी मी उघडलं आणि बघते तर काय गिरिजाच्या श्रद्धांजलीची पोस्ट होती. बापरे काय लिहिलंय इथे? मी वाचतेय तेच लिहिलंय न? मला जो अर्थ समजतोय तोच अर्थ आहे न? मी घाबऱ्या घाबऱ्या ह्यांना हाक मारली,तेही माझा आवाज, माझा टोन ऐकून धावत आले.
“अहो, वाचा हे काय लिहिलंय, मला कळतच नाहीये.”
ह्यांनी मोबाईल हातात घेतला.त्यांनी वाचलं आणि तेही सुन्न झाले. गिरीजा...? गिरीजाबद्दल
ही बातमी? दोघेही काही समजतच नसल्या सारखे गप्प बसून राहिलो,बोलत नव्हतो काही पण
गिरीजाच्या आठवणींनी व्याकूळ होत होतो.
गिरीजा, माझी विद्यार्थिनी. तसं पाहिलं तर तिला मी
शिकवत नव्हते, पण कॉलेजमधील सांस्कृतिक विभाग सांभाळत असल्यामुळे मी शिकवत नसलेली
बरीच मुलं माझ्या संपर्कात आली आणि माझ्या, माझ्या कुटुंबाच्या जवळची होऊन
गेली. गिरीजा त्यातलीच एक.भरपूर वाचणारी, उत्तम लिहिणारी, कुठल्याही प्रसंगाचं असं
वर्णन करायची की तुम्हाला जणू काही तुमच्यासमोरच ते घडतंय, तुम्ही त्याचा एक
साक्षीदार आहात असा प्रत्यय द्यायची. कथाकथन करावं तर तिनेच. म्हणूनच तर तिने
कथाकथनाच्या राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन स्पर्धेचा करंडक महाविद्यालयासाठी
जिंकून आणला होता .
ती स्वतः लेखन उत्तम
करायची, कविता,कथा वगैरे.अभिनय उत्तम करायची.बोलघेवडी होती. Dashing होती. जितकं छान
आणि लवकर लोकांना आपलसं करायची तितकेच कोणाला खडे बोल सुनवायलाही कमी नाही करायची.
तिला माझ्यासारखं शिक्षक व्हायचं होत. ती खरंच
उत्तम शिक्षक झाली असती. पण बँकेत नोकरीला लागली. स्वतःच्या हिमतीने मॅनेजरच्या
पदापर्यंत पोचली. पण तरीही लेखन चालूच होतं. स्थानिक नाट्यसंस्थेतून नाटकात काम
करायची. मुलं शिक्षणासाठी बाहेर पडल्यावर सामाजिक कामंही करायला लागली. जे करेल ते जीव
ओतून करायची.पण मध्यंतरी तिला अस्थमा सुरु झाला, heart problem सुरू झाले. वयाच्या मानानी लवकर, आणि तीव्र
स्वरूपाचे.तरी एखाद्या विजेसारखी, एखाद्या वादळासारखी येऊन जायची, खूप गप्पा
मारायची, किस्से सांगायची. जेमतेम अर्धा तास, पण आम्हाला प्रसन्न करून जायची. जाताना
‘काळजी घ्या, मी आहे, काळजी करू नका.’ असं हक्कानी सांगून जायची. कॉलेज संपल्यावर
आम्हाला दोघाना तिने आईबाबा म्हणायला लागली,तेही इतक्या सहज की कोणालाही आम्ही
खरंच तिचे आईबाबा आहोत असंच वाटायचं.
कोरोनाची साथ सुरु झाली,सगळीकडे lockdown
झालं, बँक अत्यावश्यक सेवा असल्याने तिला जायला लागायचं. येता नाही यायचं, पण फोनवर
बोलायची अगदी भेटून समोरासमोर बसून बोलावं तसं. पंधरा दिवसांपूर्वीच तर फोन आला होता
तिचा, खोकत होती खूप,पण म्हणाली, ‘अग,काळजी करू नकोस, viral आहे.मी ठीक आहे, सगळी
काळजी घेतेय. पण तुम्ही काळजी घ्या. कोरोनाचा जोर कमी झाला की येऊन जाईन. तुम्ही
काळजी घ्या, बाहेर पडू नका,सांभाळा.’ खूप बोलली, एक खोकला वगळला तर नेहमीसारखीच बोलत
होती.
तशी तरुण होती, खोकला viral होता असं
म्हणाल्यामुळे आमच्या मनात काही शंकाही आली नाही, आणि आज काय हे? दिवस असे आहेत, lockdown
चालू आहे,आम्ही आता सिनिअर सिटीझन्स आहोत, आम्हाला कोण सोडणार तिला तिथे भेटायला?
कोण सांगेल आम्हाला तिला नेमकं काय झालं ते?तिच्या नवऱ्याला फोन तरी कसा करू? तो
कोणत्या आणि कशा अवस्थेत असेल कोणास ठाऊक?
तेवढ्यात पेपर पडल्याचा आवाज आला, स्थानिक पेपरमधे
पहिल्या पानावर तिच्या हसऱ्या फोटोसह बातमी होती. बँकेत कितीतरी जणांशी संपर्क
येतोच, साथीनं जोरही पकडला होता, खोकल्यामुळे प्रतिकारशक्ती कमी झाली होती, जोडीला
अस्थमा आणि heart problem होताच. कोरोनाची टेस्ट positive आली होती. एरवी कितीही
लढाऊ असली तरी त्याच्याशी लढायची तिची ताकद कमी पडली होती.
आता ती आम्हाला कधीच दिसणार नव्हती. पण नवीन तंत्राचे खरंच धन्यवाद मानले पाहिजेत. आमच्या फोन मधे फोन आपोआप रेकॉर्ड होतो,एरवी लक्षातही येत नाही, पण आता ती नाही, पण तिचा आवाज आमच्याजवळ आहे. तो आम्ही कधीही ऐकू शकतो. देव करो आणि हा कोरोना,हा lockdown आता लवकर संपू दे!
पण एकच तुम्हां सर्व तरुणांना एकच विनंती,
स्वतःला सांभाळा,तुम्हाला पटल नाही, कंटाळा आला तरी खूप सांभाळा स्वतःला. तुम्हाला
काही झालं तर आमच्यासारख्या आईवडलांनी आणि तुमच्या लहान मुलांनी कुठं जायचं? आम्ही
आमची काळजी घेत आहोतच, पण तुम्ही तुमची आमच्यासाठी
काळजी घ्या. ही दुःखं पेलायच आता वय नाही आमचं. सांभाळा आणि खूप खूप काळजी
घ्या स्वतःची आणि आपल्या
कुटुंबियांचीदेखील.घ्याल ना?
- ज्योतीG (jyotigandhe28@gmail.com)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा