खूप वेळा वाटायचं.. स्टेज एक,नेपथ्य एक, प्रसंग एक, कलाकारही तेच, पण विचार वेगळे, दृष्टीकोन वेगळे, अपेक्षा वेगळ्या, मानसिक स्तर वेगळे आणि भूमिकाही वेगळ्या. त्यामुळे एकाच प्रसंगाच्या वर्णनासाठी क्रियापदेही वेगळी. यात बदल होईल?
धक्के ..
भेटलो आपण पहिल्यांदा जेव्हा,
मी दाखवणारी होते, तू बघणारा होतास
आणि तूच असणार होतास निर्णय घेणारा.
तू ‘हो’ म्हणालास तर मीसद्धा ‘हो’ म्हणायचं,
सगळं मान्य करून ‘हो’ च म्हणायचं
तसं म्हटलं तर, नाही म्हणायचा अधिकार होता मला,
अगदी अपवादात्मक परिस्थितीत ती मुभा नक्कीच होती मला.
तू मात्र ‘नाक छोटं’ ,‘दात वाकडे’ ,
‘हसली की थोडी बावळट वाटते’, किंवा ‘केस अगदीच लहान आहेत’,
असं काहीही कारण सांगून कोणालाही सरळ नकार देऊ शकतोस,
हो,असेच विचार घोळत होते माझ्या मनात,
‘नकारच नक्की’ याची खात्रीच होती मनात.
पण पहिला धक्का,तुझ्या होकाराने दिला.
तसा माझासुद्धा होकारच होता..
आता तुझ्यासोबत पुढील प्रवासात मी बनायचं होतं, कुणाची तरी आदर्श सून
कुणाची वहिनी, कुणाची काकू, कुणाची मामी, आणखीही कोणी,
तुझ्याकडून मात्र काहीच अपेक्षा नव्हती, जरी तूसुद्धा
जोडला जाणार होतास अशाच नात्यांनी.
मी मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते, धावपळ करत होते
सगळ्यांना जिंकण्यासाठी
सगळ्यांकडून ‘आदर्श ’ चे पदक मिळवण्यासाठी.
तू मात्र शांत होतास, प्रत्येक क्षण मस्त मजेत जगत
होतास.
अगदी सहजपणे, माझ्याही नकळत तू माझ्या आईबाबांचा मुलगा
होऊन गेलास.
माझ्या बहिणीचा, भावाचा लाडका रोल मॉडेल असा
‘जीजू’ झालास,
वर्षानुवर्षं ओळखत असल्यासारखा घरातलाच होऊन
गेलास,
‘जावई’ असावा तर असा, अशा ‘कौतुक मखरात’ कायम
बसलास.
तुझ्याइतके सहज नाही, पण रुळले मी पण हळूहळू
कुणाची काय अपेक्षा, कुणाला काय वाटेल..
या विचारांच्या गुंत्यातून मोकळी होत गेले हळूहळू
तू साथ दिलीस, म्हणुन थोडे सोपे झाले
सगळ्यांना आपलेसे करणे मलाही जमुन गेले
‘वटपौर्णिमेच्या दिवशी ‘हा’ जन्म सातवा असं चिडवतोस तू,
पण डोळ्यातून हसताना, हा ‘पहिलाच’ जन्म असं सांगतोस तू.
किती छान, किती सुखद धक्के दिलेस तू,
सात नाही, ‘शत’ जन्म माझ्याबरोबर असणार आहेस तू.
हो, बदल होताहेत हळूहळू. आशादायक चित्र दिसायला लागलंय. पण अजूनही ‘असंच’ असतं नेहमी सगळीकडे. जेव्हा हा बदल दिसेल ना तेव्हा ही वेगवेगळे स्तर असणारी, दाखवणे, बघणे अशी क्रियापदे नसतील. आणि मग खऱ्या अर्थानी दोन घरं रेशीमबंधानी जोडली जातील.
- ज्योतीG (jyotigandhe28@gmail.com)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा