फ्लाइंग एंजल

                   आपलं कौतुक झालं की आपल्याला खूप बरं वाटतंआणि आपल्याला आणखी ती गोष्ट करावीशी वाटतेपण दुसर्याचं कौतुक म्हणजे आपल्याकडे दुर्लक्ष किंवा कमी लेखणं नसतंतेही मोठ्या मनाने स्वीकारता आलं पाहिजे आणि कौतुकापेक्षा आपल्या आनंदासाठी आपण कोणतीही गोष्ट करावी हे सांगणारी गोष्ट.

फ्लाइंग एंजल..

सई जोरजोरात पळत होती. ग्राउंडला तिची ही तिसरी फेरी होती. प्रत्येक वेळेला तिचा वेग कमी न होता उलट वाढत होता. एक फेरी म्हणजे 25 मीटर तरी अंतर होते. पळत होती पण मनात मात्र परवाच्या नाटकाचेच विचार होते.

शाळेच्या स्नेहसंमेलनातील ‘शेवटी जय खऱ्याचाच’ या नाटकात तिने राजकन्येच्या दुष्ट मैत्रिणीची भूनिका केली होती. खरं तर सई एक अत्यंत चांगली मुलगी होती. तिला हा रोल देताना कुलकर्णी बाई म्हणाल्या होत्या, “सई,आपण नसतो तसे दाखवण्यातच खरं अभिनय कौशल्य.” सईला खरं तर नव्हतं आवडलं पण आई देखील तेच म्हणाली आणि तिने तिला तो रोल रंगवण्यासाठी खूप मार्गदर्शन केलं. आणि खरंच सईने ती भूमिका इतकी सुंदर केली की अभिनयाचं  बक्षीसही तिला मिळालं. तसं कौतुक झालं तिचं पण “छान काम केलंस” असं एका वाक्यात. दुसरं वाक्य लगेच अन्वीबद्दल असायचं,” राजकन्या म्हणून अन्वी किती शोभून दिसली नाही? गुलाबी गाऊन किती छान दिसत होता तिला.लांबसडक मोकळे केस, चमचमणाऱ्या खड्यांचा मुकुट, फारच सुरेख शोभत होता.खरीखरी राजकन्याच दिसत होती,” सारखं हेच ऐकून सईला फारच राग येत होता.

विशेषतः कुलकर्णी बाईंनी तिच्या अभिनयाचं कौतुक केल्यावर तर खूप खुश झाली होती. त्यांनी तिच्या प्रत्येक दृश्यातल्या अभिनयाची इतकी स्तुती केली की ते ऐकताना तिला खूपच भरून येत होतं. आईने घेतलेली मेहनत,त्यावेळी आई सांगत असलेले बारकावे आणि बाईचं कौतुक सगळं तेच होतं. आणि त्यामुळे तिला आणखीनच छान वाटत होतं.बाई म्हणाल्या,” आता गेला न राग बाईंवरचा बक्षीस मिळाल्यावर?” “नाही हो बाई,मी नव्हतं रागावले तुमच्यावर.” तिला आणखीनही काही बोलायचं होतं,पण तेवढ्यात तिथे अन्वी आली. आणि बाई जणू विसरून गेल्या की सई तिथे आहे ते. त्यांनी अन्वीचचं कौतुक चालू केलं.

आताही तिला तेच आठवलं आणि मनातल्या मनात धुसपुसत आणखीनच जोरजोरात पळायला लागली. आज का कुणास ठाऊक पण बाबांबरोबर ती वॉकला म्हणून आली आणि चालायच्या ऐवजी रनिंग करायला सुरवात केली. बाबा अवाक् होऊन पहात राहिले होते.

शेवटी सई एकदाची थांबली आणि बाबांजवळ धापा टाकत बसली.बाबा म्हणाले, “सई,बाळा, काय मस्त धावतेस तू! ह्या इतक्या जुन्या झालेल्या शूज मध्ये पण एवढा स्पीड? आपण तुला खास रनिंगचे शूज घेऊ यात”. सईला धावून बर वाटलं होतं. ती बर म्हणाली आणि खरंच बाबा संध्याकाळी तिला घेऊन गेले आणि शूज घेऊन आले. “आता रोज माझ्याबरोबर येत जा.” असं म्हणून तिला रोज न्यायला लागले.

ते तिला कोचकडे घेऊन गेले. ते स्वतः स्पोर्ट्समन असल्याने तिला टिप्सही देऊ लागले. आई स्वतः डाएटीशिअन असल्याने तिने सईचा छान डाएट plan बनवला. याप्रमाणे तिचं डाएट पाळायचंच आणि रुटीन ही काटेकोर सांभाळायचच. आईनी आणि बाबांनी ठरवलं.

हळू हळू सई खूपच रमली. सकाळी न उठवता उठायला लागली,कोचने सांगितलेले सर्व व्यायाम मनापासून करू लागली.आई तिचं डाएट इतक छान सांभाळत होती की भूक लागायची वेळ झाली की सईने न मागताच तिला सर्व मिळत होतं. कधी भुकेने व्याकूळ झाली नाही की अतिखाण्यामुळे जडावली नाही. नेहमी अगदी फ्रेश असायची.आणि तेही चांगल्या मूडमधे. डाएटच नाही तर अभ्यासाचं वेळापत्रकही आई उत्तम सांभाळायची. सईला पण छान वाटत होतं की तिनेही कधी तक्रार केली नाही,की कंटाळा केला नाही.त्यामुळे युनिटटेस्ट मधले सईचे मार्कही वाढले होते.

बाबांनी तिला मिल्खासिंग,पी.टी.उषा,ललिता बाबर अशा कित्येक भारतातल्या तसेच जमैकाच्या उसेन बोल्ट,अमेरिकेच्या मायकेल जॉन्सन अशा भारताच्या बाहेरच्या धावपटूंचीदेखील माहिती द्यायला सुरवात केली.त्यांच्या कष्टाची माहिती झाल्यावर सईला अजून मेहनत करावीशी वाटे.बाबा तिला वेगवेगळे videosदाखवत. खेळाडूंची postures,त्यांच्या हालचाली,styles, त्यांची expressionsइ. कितीतरी पद्धतीने बाबा तिच्याशी बोलत. आता धावत असताना सईच्या डोळ्यासमोर सगळे धावपटू येत,त्यांच्या कष्टाची,यशाची आठवण यायची आणि तिला आणखी जोर चढायचा.

एक दिवस शाळेच्या मुख्याध्यापकांनी तिला बोलावलं. तिथे शाळेचे क्रीडाशिक्षकही होते. शाळेतून जिल्हास्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धांसाठी खेळाडूंची निवड करायची होती व practice सुरु करायची होती.सरावाला सुरवात झाली.अखेरीला 200 मीटर्स व 400 मीटर्स व रिले रेससाठी तिची निवड झाली. आणखीनच जोरात सराव,व्यायाम, डाएट सगळ काही फारच नियमितपणे,व आणखीनच मनापासून सुरु झालं.

अपेक्षेप्रमाणे सईला सर्व क्रीडाप्रकारात व तिच्यामुळे शाळेला रिले प्रकारातही सुवर्ण पदके मिळाली.सईची राज्यस्तरीय टीममध्येही निवड झाली. खूप खुश होते सारे जण. आई,बाबा,तिचे कोच,क्रीडाशिक्षक, मुख्याध्यापक,आणि अर्थातच सई. सईच्या डोळ्यापुढे फक्त त्या स्पर्धा येत होत्या. आपण कसे पळालो, कसं एकेकाला मागे टाकत गेलो, आणि 200मीटर्समधे तर आपण शालेय रेकोर्ड केलं म्हणे.खूप छान वाटत होतं तिला.खूप दमल्यामुळे तिला खूप छान झोप लागली.पण स्वप्नातही ती धावत होती आणि सुवर्ण पदकं घेत होती.

दुसऱ्या दिवशी आईने तिला उठवलं.तिने बघितलं आईबाबा तयार आहेत आणि आईने पटकन तिला आवरायला सांगितलं. पण शाळेचा uniform न घालता शाळेचा tracksuit घालायला सांगितलं. सई तयार झाली.आज आईबाबापण तिच्याबरोबर येणार होते.तिने ‘का’, असं विचारलं तर ‘सहजच’ असं दोघांनी हसत हसत सांगितलं.

ते शाळेत पोचले तर कोणीच वर्गात नव्हतं,सगळे व्हरांड्यात उभे होते. शाळेच्या गेटच्या आत तिच्या एवढच तिचं cut out होतं आणि त्यावर लिहिलं होतं, Hearty Welcome & Congratulations, Sai Sathe!  Flying Angel of the school!” आणि सगळे ओरडत होते,‘सई, सई,. सईचं लक्ष आपल्या वर्गाकडे गेलं.सगळ्यांबरोबर मोठ्या मोठ्या आवाजात अन्वी पण ओरडत होती, सई,सई.’

सईने तिच्याकडे बघताच मोठ्याने परत ओरडली, सई,सई, आणि thumbs up ची खुण केली. सईला स्वतःची लाज वाटली, कारण नाटक प्रकारापासून ती अन्वीशी नीट बोलली पण नव्हती. आता तिला जाणवलं की लोक अन्वीचं कौतुक करत होते, पण ती कधीच सई काय, कोणाशीच गर्वाने वागली नव्हती. उलट ती तिच्या खास मैत्रिणीशी,सईशी नेहमीसारखीच वागत होती. आता ही ती सईचं वागणं विसरून निर्मळ मनाने तिचं कौतुक करत होती.सईचं मन एकदम स्वच्छ झालं. तिनेही तेवढ्याच उत्साहाने अन्वीकडे बघत हात वर केला,हलवलातिनेही thumbs up ची खुण केली आणि पुढे जाऊ लागली. कधी एकदा अन्वीला भेटतो असं तिला झालं.आईबाबांनी आपल्या मुळच्या, साध्या सरळ ‘सई’ला पाहिलं आणि एकमेकांकडे पाहिलं, एकमेकांकडे पाहून ते हसले पण सईच्या मनातील वादळ शमलेलं पाहून त्यांनाही मनापासून शांत वाटल्यामुळे दोघाच्याही डोळ्यातकौतुकाचं, अभिमानाचं पाणी तरळत होतं.

Audio Recording

- ज्योतीG (jyotigandhe28@gmail.com)

(ही कथा सप्टेंबर ३०, २०१९ रोजी www.atakmatak.com वर प्रकाशित झाली होती.)

टिप्पण्या

  1. छोटीशीच, पण प्रत्येकाने वाचावी अशीच..मनुष्य स्वभावाचे निरनिराळे पैलू दाखवणारी कथा ..छानच

    उत्तर द्याहटवा
  2. वरील टिप्पणी माझी आहे...प्रदीप वेलणकर

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा