वाल्या कोळ्याची बायको
होय,मी वाल्या कोळ्याची बायको बोलतेय,पण त्या वाल्या कोळ्याची नाही,तर आधुनिक वाल्या कोळ्याची.त्या वाल्या कोळ्याच्या बायकोला पापात सहभागी होणार का असं कधीतरी विचारलं तरी गेलं.मला सहभागी व्हायची इच्छा असो नसो,पापात सहभागी करूनच घेतलं गेलं.इन्कम tax वाचवायचा म्हणून माझ्या accountची निर्मिती केली गेली.त्यातून काय व्यवहार होत होते,कधी कळायचच नाही मला.फक्त मला सांगितलं जाईल तिथे आणि तेव्हा मी फक्त सही करायचीच अपेक्षा असे.वास्तविक मीसुद्धा M,Com.होते,विद्यापीठात पहिल्या पाचात आले होते.पण तरी विचारायची सोय नसे,कधी धीर केलाच तर इतकं ऐकून घ्यावं लागायचं की नकोच काही विचारणं त्याच्यापेक्षा, असच वाटायचं.
हं,तशी दु:खी वगैरे मात्र नव्हते मी.
मला काय पाहिजे ते मिळत होतं,मनाप्रमाणे खर्च करायची मुभा होती.कीटी पार्टी enjoy करायची,अमित
बरोबर छान छान नटून पार्टीजना जायचं,गोड दिसायचं,गोड गोड बोलायचं,नवऱ्याच कौतुक
ऐकायचं.पार्टीत त्याच्याकडे कौतुकानं,प्रेमानं बघायचं एवढंच माझं काम. अमित म्हणजे
माझा नवरा देखणा,कर्तृत्ववान होताच.माझं त्याच्यावर प्रेमही होतं म्हणजे अजूनही
आहे,फक्त ते सगळ्यांसमोर असं दाखवायला नाही आवडत मला.
आमचे बाबा पण खूप मोठे,हुशार आणि
कर्तृत्ववान होते.शहरामध्ये त्यांची नामांकीत कंस्ट्रक्शन कंपनी होती. कितीतरी विद्यार्थी सुरवातीच्या ट्रेनिंग साठी त्यांच्याकडे येत.छान शिकून
तयार होत आणि अक्षरशः गगनाला गवसणी घालण्यासाठी पुढे जात.पण अमित वेगळा होता,त्याच्यावर
बाबा प्रचंड खुश होते. त्यांनी स्वतःच पुढाकार घेऊन आमचं लग्न लावून दिलं.मी तर
जवळ जवळ हवेतच होते. बाबांच्या अपेक्षेप्रमाणे अमितनी खरच झपाट्यानी कंपनी वाढवली,
विस्तारित केली. बाबा गेल्यावर मात्र स्वतःची अशी ‘अमित क्रीएशन्स’ सुरु केली,आणि
कंपनी बद्दल एवढा विश्वास वाढवला,की पंचतारांकीत हॉटेल असो. हॉस्पिटल असो, रस्ते,
bridges असोत,मोठाली हौसिंग कॉम्प्लेक्स असोत, ‘अमित क्रीएशन्स’ कडे काम द्यावं
आणि निर्धास्त व्हावं.असा जणू प्रघातच पडला.
पण पुढे पुढे हळू हळू अमितचा
approach बदलत गेला.कामाच्या हव्यासापायी,काम मिळवायचंच ह्या साठी तो काय काय करत
होता काय माहीत पण कामाचा दर्जा काहीसा घसरत गेला. लोकंसुद्धा मिरची कोथिंबीरीचाही
भाव करतात,पण सिमेंट कुठलं वापरतात,tilesची जाडी, slabची जाडी कशाचाच विचार करत
नाहीत आणि आयुष्यभराची कमाई बिल्डरला देऊन टाकतात. लोकांच्या खुराड्या
एवढ्या घरातून आमचा महाल सजत होता.मी म्हणायची,”अमित,नको रे असं,आपल्याला काय कमी
आहे?” त्यावर म्हणायचा,”तुला काय करायचय? आजकाल सगळे असंच करतात,तुला काय माहीत
मोठी contracts मिळवायची असतील तर कितीजणांचे
हात ओले करावे लागतात,ते कुठून करायचे?”
एक मात्र होतं,बाकी काही असलं तरी
अमितचा,माझ्यावर,मुलांवर खूप जीव होता,माझा वाढदिवस आमच्या लग्नाचा
वाढदिवस,मुलांचे वाढदिवस तो कधी विसरला नाही.अगदी खास वेळ काढून वेगळं काही तरी
surprise देत वाढदिवस तो celebrate करायचा.त्या दिवशी आमच्या लोणावळ्याच्या
बंगल्यावर आमच्या लग्नाचा पंधरावा वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्ही गेलो
होतो.वाढदिवस मस्तच झाला.दोन दिवसांनी आम्ही निघणार होतो.आणि सकाळी फोन वाजला.
“काय? मिनिस्टर साहेबांनी शब्द
फिरवला? मिरचंदानीनी पार्टनरशिप काढून घेतली?अरे कधी घडल्या या सगळ्या गोष्टी?मला
जरासुद्धा कुणकुण न लागता? केवढी ही दगाबाजी?” काय काय घडलं होतं कोणास ठाऊक? इतके
फोन्स झाले,एवढा आरडाओरडा झाला, इतका त्याचा संताप,संताप होत होता. आणि अचानक एका
क्षणी अमित कोसळला.यश,यश आणि यशच पाहिलेल्या अमितला अपयशाचा धक्का सोसवला नाही.
डॉक्टर्स,हॉस्पिटल्स सगळी पळापळ झाली.पण
अमित पुन्हा काही स्वतःच्या पायावर उभा राहू शकला नाही.तो जिवंत राहीला पण
अर्धांगवाताच्या आघातानी लोळागोळा झालेल्या अवस्थेत. मुलं लहान होती,त्यांची
शिक्षण व्हायची होती,अजून केवढातरी संसार बाकी होता.
मलाच पुढे व्हावं लागलं,काही जण
फितूर होते,पण काही प्रामाणिक पण होते.अमितच कर्तृत्व, हुशारी जाणून होते.ते
माझ्या पाठीशी, माझ्या बरोबर उभे राहिले. हळू हळू सगळं सावरत आणलं.अमित एवढ्या
मोठा प्रमाणात तर शक्यच नव्हतं.पण ज्यांनी,ज्यांनी विश्वास दाखवला.त्यांची कामे
आम्ही ‘अमित क्रीएशन्स’च्या नावाला धक्का न लावता पूर्ण केली.लोकं माझं कौतुक
करतात,पण बहुधा अमित बरोबर राहून एकलव्यासारखी विद्या ग्रहण केली असावी.दर्जाला
धक्का लागू नये यासाठी मुलांच्या शिक्षणाबरोबर मीही काही छोटे,छोटे कोर्सेस केले.पण
खरं तर मला मिळालेल्या यशामधे अमितची पुण्याईच अधिक होती.
आज त्या दुर्घटनेलाही वीसेक वर्ष
झाली.अजूनही अमित होता तसाच आहे.पण त्याच्या डोळ्यात आता पूर्वीची चमक नाहीये, तर
आहे अपराधीपणाची भावना, अगतिकेची भावना! खरं सांगू परमेश्वरा, मला आता हे नाही सहन होत. नाही,नाही,मला
सेवा करायचा कंटाळा मुळीच नाही आलेला.पण वाघासारखा कर्तृत्ववान माझा नवरा असा
गलीतगात्र झालेला बघायची माझी सहनशक्ती
आता संपत आलीय. त्याने काही चुका,पापं केली असतील,पण त्यानी लोकांना राहायला घर
दिलं.कोणालाही त्याने असं नाही फसवलं,मी त्याच्या चुकांची तरफदारी नाही करत आहे,पण
त्याच्या चुकांच्या बदल्यात त्याला मिळालेली शिक्षाही खूप आहे.त्याची तब्येत आता
सुधारणं शक्य नाहीये,तेव्हा आता तू त्याला मुक्ती दे,देवा.आताशा बालपणातल्या माझ्या
अस्थम्यानीही खूप उचल खाल्लीय. माझीही ताकद कमी होत चाललीय.माझ्यानंतर अमितकडे कोण
बघेल,कोण घेऊ शकेल त्याची एवढी काळजी? म्हणून माझ्या डोळ्यासमोरच त्याला
वेदनामुक्त होऊ दे.त्याला आता सोडव रे साऱ्या यातनांमधून.त्याची आता सुटका कर. होय,
सावित्रीने यमाकडून सत्यवानाचे प्राण परत आणले,या संस्कारात वाढलेली मी तुला
विनंती करतेय,की त्याला मुक्ती दे,मुक्ती दे!
लेखन- ज्योतीG (jyotigandhe28@gmail.com)

सुरेख . वेगळ्या वाटेवरच मन कथन . अमितला मुक्ती एक विचारी विचार छानं
उत्तर द्याहटवाधन्यवाद,मंगेश
हटवा