मध्यंतरी ‘बाबा’ साठी लिहिलेल्या काही कविता वाचनात आल्या.त्यांचं कुटुंबाशी असणारं भावनिक नातं पाहायला मिळालं आणि मनात आलं, आमच्या काळातले बाबा म्हणजे आमचे बाबा आणि आताचे बाबा यात खूप फरक आहे. अं हं, विचारात नाही, मनो वृत्तीतही नाही, तर व्यक्त होण्याच्या पद्धतीत. आमच्यावेळी बाबा घरात असले की बऱ्याच घरात शांतता असे, कारण बराच काळ ते बाहेर असायचे आणि आई प्रत्येक बाबतीत, बाबांना विचारू,बाबा काय म्हणताहेत ते पाहू वगैरे असं म्हणायची. त्यामुळे बाबांचा मनात खूप धाक, भीती असायची. काही ठिकाणी बाबांशी संवाद आईमार्फत व्हायचा. पण आमचे वडील, बापू मात्र आमच्याशी खूप बोलत. ते घरात असले की घरात आनंदाचं वातावरण असायचं.छोट्या छोट्या गोष्टीत ते मजा आणायचे. कधी जोक्स सांगून, कधी स्वतःच गंमतशीर बोलून घराला प्रसन्न ठेवायचे. अगदी भाजी निवडण्यापासून,एखादा पदार्थ बनवण्यापासून ते आताच्या भाषेत ‘सर्व्ह’ करण्यापर्यंत ते सगळ्याची मजा घ्यायचे. म्हणजे पुलावावर potato wafers चा चुरा घालणं, आंब्याच्या छोट्या,छोट्या फोडी करून आईसबॉक्समधे थंड करून त्यावर साय पसरवणं, असं बरंच काही.स्वयंपाक हे काम बायकी आहे,बायकांनीच करायचं असं कधी त्यांना वाटायचं नाही.
बापू गोष्टीसुद्धा खूप खुलवून खुलवून सांगायचे. मोठं झाल्यावर वाटायचं,अरे, सोपं नव्हतं चार,चार मुलांना वाढवणं. किती लीलया पेललं होतं ते शिवधनुष्य आई आणि बापूंनी. विचारांनी बापू थोडे काळाच्या पुढेच होते तसं पाहिलं तर. आम्ही भावंडं आई इतकंच बापूंशी मोकळेपणानी बोलू शकायचो.
आताचे बाबा असेच मुलांशी खूप मोकळे
असतात, आमच्या बापुंसारखेच! तसेच मुलांच्या बाबतीत हळवेही असतात. पूर्वी बाबा लोक व्यक्त होत नसत,त्यामुळे
त्यांच्या मनात काय चाललंय ते कधी कळायचं नाही.पण आता कळतं, कारण बाबा आता काहीसे व्यक्त
होताना दिसतात. त्यांच्या मधे आणि मुलांमधे छान बंध निर्माण होतोय. आता ‘अहो बाबा’
ची जागा ‘ए बाबा’ नी घेतलीय. पण तरी बाबांच्या मनात मुलांच्या मनातल्या आपल्याबद्दल
असलेल्या भावनांबद्दल आंदोलनं होत असतात. ती वाचताना असं वाटतं, बापूंना पण असं
वाटत असेल का? आमच्या मनातली त्यांची प्रतिमा त्यांना कळली असेल का? पिढी बदलली
तरी मनातील भावना नाही बदललेल्या.
म्हणून बाबासाठी ही कविता, पण आजच्या मुलीकडून, आजच्या बाबासाठी! आणि कदाचित आमच्या काय भावना होत्या त्या सुद्धा बापूंपर्यंत पोहोचतील...
तूच सांग बाबा...
हे असं काय रे तुझं विचारणं,
आणि असलं लहान मुलासारखं रुसणं.
म्हणे,‘आईच तुझी प्रेमाची, वाटते माझ्यापेक्षा जवळची’.
का तर म्हणे, मी उठायच्या आधीच जातोस, मी झोपल्यावर घरी येतोस.
म्हणून तुला वाटतं, ‘मी तुला ओळखतच
नाही.
तूही माझ्या खूप जवळचा आहेस, हे जाणतच
नाही.’
पण मला चांगलं माहितेय,
रविवारी जेव्हा तू घरी असतोस, तेव्हा फक्त आमचाच असतोस.
ठेच लागल्यावर मी ‘आई ग ’ म्हणते,
पण मनात काय फक्त आईच असते ?
आठवतंय न बाबा तुला, मी बोललेला
पहिला शब्द होता ‘बाबा’ ,
आणि माझ्या मनात नेहमी तसाच असणार आहे
‘माझा बाबा’
कारण मला माहित आहे,जेव्हा सोबत असतो
बाबा,
तेव्हा कसली भीती आणि कसला बागुलबुवा
.
तुला आठवतंय,
सायकल शिकवताना मला बाबाच हवा होता,
तेव्हा आईवर माझा भरोसाच नव्हता.
स्कूटरवर आईच्या मागे बसताना, मन
‘सशा’गत होतं,
जरी ती छान चालवते, तरी मन उगाच
व्याकूळ होतं.
बाईकवर तुझ्या मागे बसताना मात्र मन
बिनधास्त होतं,
पांढऱ्या घोड्यांच्या रथात
बसल्यासारखं मन राजकन्या होऊन जातं.
काही मागितलं की, आई ‘नंतर बघू’
म्हणते,
पुढच्या महिन्यात आणू म्हणते.
पण तू मात्र लगेच घेऊन टाक म्हणतोस,
आणि स्वतःच ‘best quality’ चं घेऊनही
येतोस.
माझ्यासाठी ‘माझा’ बाबा सगळ्यात best
बाबा आहे,
काहीही करू शकतो तो, तो एवढा
strong आहे.
माझ्यासाठी तो एक खराखुरा छानसा
‘जिनी’ आहे,
आणि दाढीवाला तरी रेशमासारखा मऊशार
लोण्याचा त्याचा स्पर्श आहे.
आणि काय विचारतोस,
लग्नात माझ्या, दमलेल्या बाबासाठी
रडशील का?
आपल्या बाबाची कधी आठवण काढशील का?
खरं सांगू बाबा तुला,
रडू येईल मला, तरी मी कुणासाठीच
रडणार नाही
कारण तुझ्या डोळ्यातलं पाणी मला
बघवणार नाही.
तू हळवा होऊन माझ्या आठवणीत व्याकूळ
होशील
पण आई मात्र तुझ्यासाठी ठाम उभी
राहील,
बाबा, मी तुम्हां दोघांची, सांग नं कशी विभागणी करू प्रेमाची?
माझ्या मनात,डोळ्यात प्रतिमा तुमची
दोघांची.
डोळे उघडले की, तुम्हीच स्वप्नही फुलवता, सत्यही खुलवता.
डोळे मिटले की, मायेत मिटवूनही टाकता,सोबत असल्याचा विश्वासही देता.
आता तूच सांग बाबा मला,
कोण आहे अधिक जवळचं मला,
आई की बाबा, तूच सांग नं बाबा
कोण आहे अधिक जवळचं मला,
आई की बाबा ...... सांग ना रे …
- ज्योतीG (jyotigandhe28@gmail.com)

किती छान लिहिलंयस...बापू मामा आलेला आम्हाला खूप आवडायचा...मुंबई मधे आल्यावर त्याच्या हातचे ऑम्लेट मस्ट असायचे...
उत्तर द्याहटवाEnjoyed!
उत्तर द्याहटवाधन्यवाद!
हटवामस्तच
उत्तर द्याहटवाधन्यवाद
उत्तर द्याहटवाकिती सुंदर लिहिले य. अव्यक्त नातं
उत्तर द्याहटवा