शुभ्रमेघ आणि कृष्णमेघ

 

शुभ्रमेघ आणि कृष्णमेघ

आकाश अगदी निरभ्र होतं.निळशार,नितळ.असं आकाश शुभ्रमेघला खूप आवडायचं.कारण त्यात त्याचं शुभ्रपण अगदी स्पष्ट दिसायचं,शोभून दिसायचं.अशा आकाशात खेळता खेळता,स्वच्छंद बागडता,बागडता तो स्वतःचे खूप विविध प्रकारचे आकार करी,कधी ससा,कधी सिंह कधी कुठला पक्षी,कधी एखाद्या झाडाचा आकार आणि स्वतःच्या मस्तीत खेळत राही.

त्याने लगेच बागडायला,धमाल करायला सुरवात केली. किती वेळ गेला कोणास ठाऊक, भानच नव्हतं त्याला वेळाचं.पण सहज त्याची नजर खाली गेली. तो एका मोठ्या बागेच्या वर होता. आणि कितीतरी लहान मुले,त्यांचे आईबाबा वर बघत होते,कुणी फोटो काढत होते.कुणी आता शुभ्रमेघने  कोणता आकार केला आहे त्यावर मोठ्यामोठ्याने बोलत होते. एकंदरीत सर्व मजेत होते.एकमेकांचा अंदाज सारखा आला की टाळ्या देत होते. शुभ्रमेघला मजा वाटली.असं पहिल्यांदाच त्याला जाणवलं होतं.त्याला आणखी जोर चढला.तो आणखी, आणखी वेगवेगळे आकार करू लागला.

तेवढ्यात तिथे कृष्णमेघ आला.त्यालाही मजा वाटली.तो शुभ्रमेघला म्हणाला,“चल,आपण दोघे खेळू या.” शुभ्रमेघला राग आला.चांगला मी मुलांबरोबर खेळत असताना हा का आला? याचा काळा रंग आपल्या बरोबर एकत्र आला तर काय आकार स्पष्ट दिसणार आहेत? उलट आपल्यालाच याचा काळा रंग लागेल,आपण शुभ्र,पांढरे,गोरे दिसू का मग? मग मुलांना काय मजा येणार?’ त्याने खाली पाहिलं. मुलं, मोठी माणसं  भराभरा निघाली होती.कोणाचच वरती लक्ष नव्हत.त्याला कृष्णमेघचा आणखीनच राग आला.रागाने तो ओरडला,“तू का आलास इथे?मी चांगला खेळत होतो मुलांबरोबर.तू आलास आणि ती निघून गेली.तू नको आहेस मला माझ्याबरोबर.किती काळा आहेस तू! तुझा रंग मला लागून मी पण काळा होईन,मग माझ्याशी मुलं खेळणार नाहीत. तू नको आहेस मला.जा तू,जा,जा,जा.”

कृष्णमेघ हिरमुसला.त्याला खरच शुभ्रमेघशी  खेळायचं होतं.माझा रंग काळा आहे, कबूल. पण मी वाईट आहे का? घाणेरडा,अस्वच्छ आहे का? का नाही आवडत त्याला मी आणि माझ्याशी खेळायला? तो गोरा आहे,पांढरा आहे म्हणून तो शुभ्रमेघ आहे,ठीक आहे पण खेळण्याचा आणि आपापल्या रंगांचा काय संबंध?’ रडत रडत तो तिथून निघाला.तोपर्यंत शुभ्रमेघ खूप लांब गेला होता.

शुभ्रमेघ पुढे पुढे जात होता.हळूहळू तो पुन्हा नेहमीच्या मनःस्थितीत येऊ लागला.कृष्णमेघ बरोबर झालेलं भांडण तो विसरला. परत छान उडत उडत पुढे जात होता. तो पण आता तो खाली देखील  बघू लागला.कोणाचं लक्ष असेल तर तो त्यांची विविध आकार घेऊन करमणूक करू लागला.

जाताजाता एका  ठिकाणी खूप माणसं आकाशाकडेच पाहत आहेत असं त्याने पाहिलं.त्याला वाटलं आता मस्त खेळू या, मजा येईल.पण त्यांचे हातवारे काहीतरी वेगळच बोलत होते. तो खाली उतरू लागला तसे त्यांचे हातवारे अधिकच वाढले.जणू काही ते त्याला ‘तू जा,तू जा’ म्हणत होते.तो आणखी खाली आला. आता त्यांच बोलणं त्याला स्पष्ट ऐकू येऊ लागलं.ते म्हणत होते “हा कशाला आलाय इथे? ह्याला पाहून पाहून वैताग आलाय. काही उपयोग नाही याचा.आम्ही इथे पावसाची वाट पाहून थकून गेलो आहोत. पाऊस नाही, पाणी नाही.शेतं आणि आमचे घसे कोरडे पडायला लागले. जनावरांना,लेकरांना द्यायला अन्न नाही, पाणी नाही.अन आकाशात नुसतेच पांढरे ढग! देवा तुला कधी रे दया येणार आमची?”

सांब सदाशिव,पाऊस दे,शेते,भाते पिकू दे,पैशाला पायली विकू दे.” “दया कर परमेश्वरा,दया कर”.

शुभ्रमेघ  खूप घाबरला. ह्यांना आपण नको आहोत हे पाहून त्याला खूप वाईट वाटलं.त्याला एकदम कृष्णमेघची आठवण आली. आपण त्याला असंच,तू नको,तू नको’, केलं होतं.त्याला किती वाईट वाटलं असेल तेव्हा. आपण खूप चुकीच वागलो आहोत.आता तो भेटला तर खरच त्याची मी  माफी मागेन. आणि असं कोणालाच पुन्हा म्हणणार नाही.

⛈⛈⛈⛈⛈⛈⛈⛈⛈⛈⛈⛈⛈⛈⛈⛈⛈⛈
तेवढ्यात कसलातरी गडगडाट त्याला ऐकू आला,तो घाबरला,आणि झाडाच्यामागे लपून बसला.तिथून डोकावून पाहिलं तर त्याला त्याचा मित्र कृष्णमेघ दिसला.विजांच्या रोषणाईत आणि ढगांच्या वाजंत्रीत तो एखाद्या महाराजासारखा ऐटीत येत होता. शुभ्रमेघने खाली बघितलं तर सगळी माणसं ही नाचत होती,गात होती,भिजत होती पण खूप आनंदात होती. ‘आता आमची शेतं पिकतील.धान्य पिकेल. सुखाचे दिवस येतील.’असं काय काय पण आनंदात बोलत होती. ‘काळ्या ढगा,कृष्ण मेघा,खूप उपकार केलेस,बाबा! दुष्काळातून वाचवलस आम्हाला.’


शुभ्रमेघच्या लक्षात आलं,ज्याला काळा रंग म्हणून आपण हिणवलं,त्याच्यात पाणी असतं आणि तो लोकांना खूप हवा असतो. तो हळूच कृष्णमेघजवळ गेला आणि म्हणाला, मला माफ कर. मी तुझा खूप अपमान केला.तू किती उपयोगी आहेस हे आता कळतंय मला.”

कृष्णमेघ हसून म्हणाला,“शुभ्रमेघ,तुझ्या लक्षात आलं न, बरं झालं.हे अगदी लक्षात ठेव की  प्रत्येकात काही न काही चांगलं असत,आणि ते आपण पाहायचं असतं.नुसतं बाहेरून वरवरचं बघून कोणाबद्दल मत बनवायचं नसतं.आणि कोणाशी तुच्छ्तेने  वागायचं नसतं,तू नको,तू नको असं म्हणायचं नसतं.त्याला वाईट वाटतं न मग? पण तुला सांगू,मीसुद्धा लोकांना काही नेहमी हवा असतो असं नाही,खूप पाऊस झाला तरी लोक हवालदिल होतात.त्यामुळे मी त्यांना ठराविक वेळात आणि ठराविक प्रमाणातच हवा असतो. जास्त पाऊस पाणी झालं की लोक म्हणतात आता बस रे देवा पाऊस.आता उघडीप पडू दे रे. आकाश आता मोकळं होऊ रे देवा.अशावेळी तू दिसलास की त्यांना आनंद होतो. म्हणजे लोकांना आपण सगळेच हवे असतो.कोणीच मोठं नाही आणि कोणीच छोटं नाही.आपल्याला पृथ्वीचं  टोकाच्या तापमान बदलापासून संरक्षण करायचय, सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांमधील तीव्रता शोषून घ्यायचीय,सगळीकडे संतुलित उर्जा पोचवायचीय.आपल्याला किती महत्वाची कामं आहेत,भांडून कसं चालेल? तेव्हा आपण दोघ छान मित्रच होऊ या. मी पाणी देईन,तू मधून मधून त्यांची छान करमणूक कर.”

आणि दोघं तिथून निघाले,मस्त हातात हात घालून.पांढरा कुठला,काळा कुठला ते कोणाला ओळखता येणार नाही इतके दोघेजण एकत्र आले.आता एकत्रच असतात आणि पावसाळ्यात तर दोघं मस्त लपाछपीचा खेळ खेळतात.

 

Audio Recording

लेखन-  ज्योतीG (jyotigandhe28@gmail.com)

(ही कथा एप्रिल १३, २०१९ रोजी www.atakmatak.com वर प्रकाशित झाली होती.)

टिप्पण्या