मातृत्व

अंगणात लावत होते,एक छोटंसं रोप;

मनात रुंजी घालत होतं,त्याचं बहरलेलं रूप.

खूप मनापासून त्याची निगराणी केली,

सगळं हवं,नको, सगळी हौसमौज पुरवली.

एक सकाळ वेगळीच उगवली,

अबोध,इवलीशी एक कळी मला दिसली.

अशा कशा एकटीनेच सोसल्यास प्रसव कळा?

आलं होतं का पाणी तुझ्या डोळा?

शांत,क्लांत वाटत होती मला त्या कळीची आई,

दमल्यासारखी वाटली तरी,खुशीत होती सई.

हळू हळू कळी मोठी होत गेली,

साऱ्या अंगांनी फुलली,अगदी देखणी दिसू लागली.

एकेका पाकळीनी उमलू लागली.

पहाता पहाता अशा कितीक कळ्या आल्या.

आल्या,मोठया झाल्या,फुलल्या,आणि नंतर कोमेजल्या

असं कसं मातृत्व असत झाडाचं?

एकीकडे फुलत राहायचं,एकेका कळीला मोठं करायचं

पाकळी पाकळीनं फुलवायचं ,

पण तिचं कोमेजंण ही पाहायचं,

मातीतून तिला परत आपल्यात सामावायच.

कितीवेळा फांद्यांची काटछाट अंगावर घ्यायची, 

आणखी कितीतरी प्रसव वेदना सोसण्यासाठी.

पण तरी प्रसन्न,हसतमुख दिसायचं,

प्रत्येक चेहऱ्यावर एक हास्य आणायचं.

असंच वर्षानुवर्षे करत राहायचं. वर्षानुवर्षे करत राहायचं.......


    ही कविता लिहून झाली आणि नेहमीसारखं मोकळं मोकळं नाही वाटलं. जमलंय मला लिहायला, मला काय सांगायचं आहे, ते व्यक्त झालंय असं नाही वाटलं.उलट लिहित असताना सुद्धा आणि नंतर सुद्धा “असं कसं हे मातृत्व असत?

एकीकडे फुलत राहायचं,

एकेका कळीला मोठं करायचं

पाकळी पाकळीनं फुलवायचं ,

पण तिचं कोमेजणं ही पाहायचं,

   या ओळी अस्वस्थ करत राहिल्या.का कुणास ठाऊक मनात पेट्रोल जळीत कांडातील लेक,निर्भया आणखी कितीकजणी आठवत राहिल्या.त्यांच्या आयांची आठवण येत राहिली.छोट्या,छोट्या दु:खानी,अपयशांनी कोमेजलेल्या आपल्या कळ्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी आपण जीवाची पराकाष्ठा करतो.त्यांच्यापेक्षा जास्त अंगांनी,जास्त तीव्रतेनी सहन करून त्यांच्या वेदना कमी करायचा प्रयत्न करतो.या आयांच्या मनात काय येत असेल,किती हतबल वाटलं असेल.असेच काही काही विचार येत राहिले. तेव्हापासून फुललेलं झाड पहाताना जेवढं मन प्रसन्न होतं,तेवढच झाडाखालची कोमेजलेली फुलं अस्वस्थ करतात.

    आपण नेहमी म्हणतो दु:खद आठवणी विसरायच्या, सुखद आठवणी जागवायच्या.पण अशा आठवणी त्रास देत असल्या तरी त्या मनातून काढायच्या नाहीत.कारण कदाचित त्यामुळे पुढच्या लेकी अधिक जागरुक राहण्याचा,सबळ होण्याचा,सशक्त होण्याचा प्रयत्न करतील.आणि कदाचित हे स्वप्न असेल पण पुरुष ही आपला दृष्टीकोन बदलतील.थोडे तरी माणुसकीनी वागतील कारण तेही अशा निर्भयांचे बाबा किंवा भाऊ असतीलच की!

नको, नको ही अशी परीक्षा मातृत्वाची

स्त्रीलाच फक्त मिळालेल्या अनमोल वरदानाची.....

---    ज्योतीG (jyotigandhe28@gmail.com)

टिप्पण्या