मुलं आपली मोठी होत असताना आपण शिकवलेल्या प्रत्येक गोष्टी खरतर त्यांच्या पद्धतीनी अर्थ लावून मनापासून करत असतात, पण कधीतरी काहीतरी गोंधळ होतो त्याच्या मागे काय कारण असू शकतं,ह्याचा विचार केला तर आपल्यालाही कळेल आपल्या आणि मुलांच्या संवादात काहीतरी राहून गेलंय,काय राहिलेलं असतं ? प्रहासच्या ह्या गोष्टीत उत्तर सापडेल आपल्याला.
दारावरची बेल वाजली म्हणून प्रहास उठला आणि त्याने दरवाजा उघडला. दारात सुहासिनी उभी होती आत येतायेताच एकीकडे चपला काढत,हातातली पर्स भिरकावून देत जवळ जवळ रडत रडतच प्रहासवर ओरडायला लागली,“कसा आलास तू? थांबता येत नाही तुला दहा मिनिट , आई येईस्तोवर ताई कडे? येणारच होती ना आई? का कुठे पळून जाणार होती?फार मोठा झालास न?”लाडका प्रहास
प्रहासला आई रडत बोलत असल्यामुळे काय म्हणतेय ते नीटसं कळत नव्हतं.फक्त आई आपल्यावर
चिडलीय एवढं मात्र कळत होतं प्रहासला. आजीनं आईला जवळ घेतलं ,“शांत हो,सुहासिनी. आलाय प्रहास घरी. सुखरूप आहे तो.शांत हो.”आणि सुहासिनीला थोपटत राहिली.
थोड्या वेळानं शांत झाल्यावर सुहासिनीनी सांगायला सुरवात केली,ती वेळेवर
निघाली होती,पण वाटेत प्रहासच्या वर्गातल्या मुलाची,समीरची आई भेटली,आणि समीरच्या
आजीच्या आजारपणासंबंधी सांगायला लागली, तिला मधेच थांबवता येईना म्हणून प्रहासला गाण्याच्या क्लासवरून आणायला ताईकडे पोचायला उशीर झाला.पाहते तर तिकडे तो नव्हता. ‘तो गेला’, म्हणून ताईनी सांगितलं आणि वेड्यासारखी धावत येऊन गाडीला किक
मारून इतकी फास्ट आले, पण वाटेत कुठे हा दिसला नाही.”
“आणि म्हणून आल्या आल्या त्याला ओरडलीस. बरोबर आहे तुझं, तू व्याकूळ होणं अगदी साहजिकच आहे. आता शांत हो, व्यवस्थित आहे प्रहास.”
“पण हा आलाच का? माझी थोडावेळ वाट पाहता येत नाही ह्याला? आधीच आपल्या
रस्त्यावर केवढा traffic असतो आणि जेमतेम सात वर्षाचा हा मुलगा!.काय रे सांगितलंय
न तुला माझी वाट पाहायला?”
“ह्या प्रहासच्या आई का?” असं समोर बसलेल्या आजींनी विचारलं आणि सुहासिनी एकदम
भानावर आली. इतका वेळ कुणी अनोळखी बसलंय हे लक्षातच नव्हतं आलं तिच्या.
“तुमचं व्याकुळ होणं अगदी साहजिकच आहे. मी जोशी आजी, समोरच्या भागात, सुखनिवास
सोसायटीत राहते. तुमच्या पलीकडच्या गल्लीत सुखटणकर रहातात न? त्या आजी म्हणजे माझी
बहीण आहे. मी नेहमी येते इथे.पण नेहमी मुलगा,सून कोणीतरी सोडतात. आज त्यांना वेळ
नव्हता, ते म्हणत होते उद्या सोडतो म्हणून पण तिच्या नातीचं बारसं आहे, तिला मदत
म्हणून मी म्हटलं आजच जावं.नेहमीचाच रस्ता आहे.जाईन मी.पण एवढ्या traffic मधे मला
रस्ता क्रॉसच करता येईना.वाटलं परत जावं. तेवढ्यात हा आला आणि
म्हणाला,”आजी,तुम्हाला रस्ता क्रॉस करायचाय न? मी नेतो तुम्हाला.” “आणि तुम्हाला सांगते, गाड्यांसाठी रेड सिग्नल आणि रस्ता
क्रॉस करण्यासाठीचा हिरवा सिग्नल लागल्याबरोबर त्यांनी माझा हात धरला, आणि सिग्नल तोडणाऱ्या गाड्यांना हाताने रेड
सिग्नल दाखवून ठामपणे मला हाताला धरून व्यवस्थित रस्ता क्रॉस केला आणि आम्ही
रस्त्याच्या ह्या बाजूला आलो.त्यांनी खूप व्यवस्थित आणलं मला.”जोशी आजीनी सांगितलं
.
“बापरे, म्हणजे आणखी तुमची जबाबदारी,आजीला काही झालं असतं तर? एवढा आगाऊपणा
करायला सांगितलं कोणी तुला?” सुहासिनीनी आणखी रागावून विचारलं.
प्रहास गप्प राहून ऐकत होता.त्याला कळतच नव्हतं, त्याचं काय चुकलं? प्रहास एक
अगदी शहाणा मुलगा होता.शिकवलेल्या सगळ्या गोष्टी मनापासून करायचा. अभ्यास असो,खेळणं असो,पुस्तक वाचन असो छान
आवडीने करायचा.मागे आईची मैत्रीण आली होती
तिच्या मुलाबरोबर अमेरिकेच्या मावशीने पाठवलेली Thomasची ट्रेनसुद्धा
त्याच्याबरोबर शेअर करून आनंदाने खेळला होता. आजी नेहमी सांगत असते,आई खरतर खूप
शिकलेली आहे. आधी छान नोकरी पण करत होती.पण प्रहास झाल्यापासून तिने जॉब सोडला
होता आणि पूर्णपणे प्रहासच्याच सगळ्या गोष्टींवर, अभ्यासावर, इतर activities वर
लक्ष देत होती. त्याच्याशी खेळायचं, त्याला नवनवीन गोष्टी सांगायच्या,नवनवीन
काहीतरी शिकवायचं,तो स्वावलंबी व्हावा म्हणून छान बोलत त्याची त्याला काम करायला
लावायची. काही प्रमाणात घरून काम करायची पण प्रहासच्या सर्व गोष्टीतून वेळ मिळेल
तेव्हा. प्रहासलाही आई म्हणजे सर्वस्व होती. तिचं तो ऐकायचा नाही असं सहसा व्हायचं
नाही.पण म्हणूनच त्याला आई का रागावली तेच कळत नव्हती. आणि ती चिडलीय तर रडतेय का?
काहीच समजत नव्हतं त्याला.
क्लास संपल्यावर बाकी मुलं घरी गेली.वाट पाहून तो कंटाळला. ताईना ‘खाली थांबतो’,
म्हणून सांगून तो खाली आला.तो थांबला थोडावेळ, पण नंतर त्याच्या मनात आलं, आई
ह्याच रस्त्यांनी येते, हळूहळू चालायला
लागू, भेटेल आई वाटेत. म्हणून तो निघाला.मोठ्या रस्त्यापर्यंत येऊन पोचला तरी आई
भेटली नाही,आणि आजी बिचाऱ्या रस्ता क्रॉस करायला उभ्या होत्या आणि त्यांना जमत
नव्हतं.त्याच्या मनात आलं की आपण मदत करू त्यांना. कितीवेळ बिचाऱ्या उभ्या राहणार?
म्हणून तो त्यांना अगदी व्यवस्थित रस्ता क्रॉस करून घेऊन आला.
जोशीआजी सांगत होत्या, “खरं तर माझच चुकलं होतं, मुलगा सून म्हणत होते,उद्या तुला नेतो म्हणून.पण मला असं
वाटलं नेहमी तर येतो आपण. जाऊ या
आजच.रस्ता क्रॉस करता येईना तेव्हा परत फिरायचा विचार होता,तेवढ्यात हा आला.मलाही
वाटलं हा एकटाच कसा,पण विचार केला आपण जाऊ ह्याच्याबरोबर, त्याला त्याच्या घरीच सोडू.म्हणून म्हटलं त्याला,“चल जाऊ.” खूप
व्यवस्थित क्रॉस करत होता तो. मी पण त्याचा
हात घट्ट धरला होता, आणि त्याला घरी घेऊन आले. म्हटलं, ह्याला सुखरूप सोडणं
पण होईल,तुमची ओळखही होईल आणि मला बहिणीकडे जाता पण येईल.”
“म्हणजे आजी, मी तुम्हाला सांभाळून आणलं की तुम्ही मला?”प्रहासनी विचारलं.आणि
सगळेच हसायला लागले.सुहासिनीन त्याला जवळ घेतलं आणि म्हणाली.”दोघांनी एकमेकांना.पण
पुन्हा असा जीवघेणा धाडसीपणा करू नकोस, जीव
उडून जातो रे माझा. एवढा मोठा नाही झाला आहेस अजून.”
कधी कधी अचानक अशा गोष्टी घडतात, आणि माणूस माणसाला जोडला जातो. प्रहासची आजी,जोशी
आजी,सुखटणकरआजी आता चांगल्या मैत्रिणी झाल्या आहेत, आणि आईला उशीर झाला की, नव्हे,
कधी कधी मुददाम क्लासवरून येताना प्रहास जोशीआजीकडे थांबतो, आणि आई त्याला तिकडे
घ्यायला जाते. आई आता अगदी निश्चिंत असते प्रहासच्या बाबतीत.
पण प्रहासच्या हे ही लक्षात आलं होतं की काही गोष्टी करायला तो अजूनही लहान
होता. त्याला ‘त्यात काय एवढं?’ असं वाटणाऱ्या ‘त्या कृतीत’ खूप मोठा धोका होता
त्यादृष्टीने तो खरंच तो लहान होता. काहीही घडू शकलं असतं त्यावेळी. विशेषतः आई
ज्या पद्धतीने बोलली,रडली ते तर प्रहास विसरूच शकत नव्हता, तो आई, बाबा, आजी,
आजोबा सगळ्यांचच व्यवस्थित ऐकायला लागला होता. आई बाबा,घरातले सगळेच मोठे त्याला
प्रत्येक गोष्टीचा अर्थ सविस्तर सांगून समजावू लागले, कशाचे काय परिणाम होतात
त्याबद्दल त्याच्याशी बोलू लागले. प्रहास मोठा होत होता, केवळ ‘आम्ही सांगतो
म्हणून तू ऐकायचच’ अशा पद्धतीने बोलत नसल्यामुळे त्यालाही व्यवस्थित कळायला लागलं
होतं. त्यामुळे तोही आता योग्य दिशेने विचार करू लागला होता. त्याला कधी वाटलंच ‘त्यात
काय मोठं?’ अशा वेळी त्याला त्यावेळची आई आठवे आणि तो पुन्हा व्यवस्थित विचार
करूनच कृती करी. ह्या सगळ्यामुळे तो सगळ्यांचाच लाडकाही झाला होता आणि
पूर्वीपेक्षाही त्याचे जास्तच लाड व्हायला लागले होते. कोणत्याही मुलाला आणखी काय
हवं असतं? हो न?
Audio Recording
लेखन- ज्योतीG (jyotigandhe28@gmail.com)

उत्तर द्याहटवाकथा खूप छान आहे. मला ऑडिओ रेकॉर्डिंग देखील आवडले. अभिनंदन!
धन्यवाद,असंच लेखायतन वाचत रहा.आणि प्रतिसाद देत राहा.
हटवाआईचं हदय प्रहासच निरागस मन जोशी आजींचा लाघवी स्वभाव छान जमलाय .
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाखूपच छान
उत्तर द्याहटवाखूपच छान
उत्तर द्याहटवा