हो बाई, प्रत्येकाला स्वतःची अशी स्पेस हवीच,
स्वतःशी बोलण्यासाठी, स्वतःला ओळखण्यासाठी.
आता मी कशी निवांत बसलेय.
स्वतःशीच विचार करत बसलेय,
परवा आहे वाढदिवस, माझ्या सख्ख्या मैत्रिणीचा.
‘पन्नासावा’ म्हणजे special साजरा करण्याचा.
सगळ्यात आधी ‘मी’ wish करायला हवंय,
मस्त surprise plan करायला हवंय.
स्वारीचा चहा कमी करायला हवाय,
एखादा छानसा पर्याय शोधायला हवाय.
ह्यावेळच्या सोन्याच्या भिशीत,
लेकीला दागिना करायला हवा,
होणाऱ्या सुनेसाठीसुद्धा तसाच घडवायला हवा.
अरे, बरं झालं, आठवलं,
आईंची पंचाहत्तरी ह्या वर्षी,
बाबांचं सहस्त्रचंद्र दर्शन पुढच्या वर्षी.
काहीतरी वेगळं, खास करायला हवंय.
लेकाचं त्यांना खूप कौतुक वाटायला हवंय.
पण हे असं काय होतंय?
मला नेमकं काय वाटायला हवंय?
माझ्या मनातले विचार वेगळेच,
माझ्या स्पेसमध्ये ‘मी’ सोडून सगळेच.
पण हो बाई, तरी प्रत्येकाला स्वतःची अशी स्पेस हवीच.
काय सांगावं,
कधीतरी मी स्वतःशी स्वतःबद्दल बोलेनही.
स्वतःला सापडेनही, स्वतःला ओळखेनही,
स्वतःतल्या ‘नव्या’ मला फुलवेनही,
आणि मीच माझ्याकडे कौतुकाने पाहीनही.
म्हणूनच म्हणते,
प्रत्येकाला स्वतःची अशी स्पेस हवीच,
स्वतःशी बोलण्यासाठी, स्वतःला ओळखण्यासाठी.
ज्योतीG (jyotigandhe28@gmail.com)

खरंच अशी स्वतः ची स्पेस हवीच.
उत्तर द्याहटवालेखायतन म्हणजे तुमचा स्वतःचा स्पेस. त्याचा उपयोग तुम्ही खूप छान करता. त्या स्पेस मध्ये आम्हालाही थोडीशी जागा दिलीत म्हणून खूप धन्यवाद. - उज्ज्वला जतकर.
उत्तर द्याहटवा