शाब्बास अन्वेष!

शाब्बास अन्वेष,

    अन्वेषला आईबाबांचा खूप राग आला होता. त्यांनी म्हट्ल्याप्रमाणे सहामाही परीक्षेत 80 % च्या वर म्हणजे 84.7 % मिळवले होते. आता त्यांनी कबूल केल्याप्रमाणे घरात डॉगी आणायला पाहिजे होता. आता म्हणतायत, सोसायटीच्या सेक्रेटरीला विचारायला पाहिजे. त्यात काय विचारायचं ? मागे नव्हता का आपण पाळला?

त्याला आठवलं, तो जेमतेम चौथीत होता.शाळेतून घरी येत होता आणि घराजवळच्या गल्लीत एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू होतं.त्याच्या पायाला काहीतरी लागलं होतं म्हणून ते लंगडत होतं ते दुखण्यानी खरं तर विव्हळत होतं. आजूबाजूला मुलं जमली होती,ती त्याला खूप त्रास देत होती.ते ओरडायला लागलं की जोरजोरात हसायची. अन्वेषला खूप राग आला.मुलांशी रागानी भांडून त्या पिल्लाला तो घरी घेऊन आला.आई म्हणाली,”अरे अन्वेष, त्याला लागलंय, त्याची खूप काळजी घ्यायला हवी.” “ मी घेईन आई,काळजी.” अन्वेष नुसताच म्हणालाच नाही तर त्यांनी त्याला खूप सांभाळलं खूप छान.तेव्हा उलट सेक्रेटरी काकांनी त्याचं कौतुक केलं होतं.सगळीकडे छान खेळायचा आपला जिमी.सगळ्यांना आवडायचा तो.

पिल्लाला बरं वाटायला लागल्यावर मात्र एक दिवस ते पिल्लू कुठे गेलं ते त्याला सापडेच ना! शेजारच्या काकांनी त्याला सांगितलं की ,“अरे खेळता खेळता ते बाहेर गेलं असेल आणि त्याचवेळी नगरपालिकेची गाडी त्याला घेऊन गेली असावी बहुधा. त्याच्या गळ्यात पट्टा नव्हता न! मी स्कूटरवर होतो,आणि घरी येता येता ती गाडी मला जाताना दिसली,आणि नेहमीसारखं पिल्लू मला खेळताना दिसलं नाही म्हणून मी इकडे,तिकडे पाहिलं पण मनात काहीशी शंका येऊन गाडीच्या मागे गेलो पण तोपर्यंत खूप पुढे गेली होती गाडी.”

अन्वेषला खूप दिवस त्याची आठवण यायची पण हळू हळू तो विसरला. पण चिमण्यांसाठी प्यायला पाणी ठेवण्यासाठी,तांदूळ ठेवण्यासाठी त्याने एक घर तयार केलं आणि घराजवळच्या झाडावर अडकवून ठेवलं. तो, त्याची आई, त्याचे बाबा कोणीतरी त्यात रोज पाणी आणि तांदळाचे दाणे ठेवत असत. पण आता त्याला घरी खेळायला आपल्याकडे डॉगी असावा असं वाटायला लागलं होतं. दिवसभर आईबाबा ऑफिसमधे असतात.मावशी येतात,त्याची काळजी घेतात, पण त्यांच्याशी काय खेळायचं?लहानपणी ठीक होतं. आता त्याला डॉगी हवा होता.आईबाबांनी त्याला समजावून सांगितलं, “अरे,आपल्या सोसायटीत नाहीये परवानगी कुठलाही पाळीव प्राणी ठेवायला. तेव्हा तू लहान होतास आणि कुत्र्याचं जखमी पिल्लू आपल्याकडे खूप दिवस राहील असं त्यांना वाटलं नव्हतं. तेव्हाही ते खूप दिवस असतं तर त्यांनी परवानगी नसती दिली. आणि दुसरं म्हणजे तुझेही शाळा सुटल्यावर दुपारी क्लासेस असतात. एकट्या मावशी कशा सांभाळू शकणार त्याला? तसा मोकळा वेळ तुला कमीच असतो, आता अभ्यास पण वाढत जाणार आहे. एकदा डॉगीला आणलं की त्याची काळजी नको का घ्यायला?”

मग बाबांनी एक तोडगा काढला.शाळेच्या अभ्यासाबरोबर पक्षी निरीक्षण, प्राण्यांची माहिती, त्यांचे फोटो,त्यांच्या सवयी,अशा गोष्टींचे संकलन त्याने करायचे असं त्याला सांगितलं. National Geography, Discovery, Animal Planet अशा channels वरचे कार्यक्रम पाहणे त्याला फार आवडायचं. त्यामुळे हे काम त्याला आवडलं.त्याला आईबाबा बऱ्याच वेळेला अभयारण्याच्या सहलीला पण घेऊन जायचे, बाबा म्हणाले,“आता एक तुझ्यासाठी आपण छान कॅमेरापण घेऊ. आपण कुठे गेलो की तू तुला पाहिजे तसे फोटोज काढ. तुला आवडेल.”

बाबांनी त्याला खरच एक कॅमेरा आणला, त्याला photography शिकवली. कॅमेरा कसा हाताळायचा,कसा सांभाळायचा, त्याची काळजी कशी घ्यायची,सगळं शिकवलं. तो आता photography पण छान करायला लागला होता.तो लवकरच डॉगीबद्दल विसरला.

त्याचं प्राणीप्रेम हा सगळ्यांच्या कौतुकाचा विषय होता.आईबाबांना वाटायचं हा बहुधा wildlife photography च्या क्षेत्रात जाणार. त्यासाठी लागणारा patience ही त्याच्याकडे  होता. बाबा त्यासंदर्भात खूप माहितीही गोळा करत होते,तो स्वतःही खूप उत्सुक होता.

एक दिवस बाबा टीव्ही वरच्या बातम्या बघत होते आणि तो क्लास मधून घरी आला,आणि बाबांजवळ सोफ्यावर बसला आणि बातम्या पाहू लागला.बातमीदार सांगत होता “दैवी चमत्कार! कोंबडीला चार पाय !” आणि कॅमेरा खाली आला,कोंबडीवर आला,एका कोंबडीला खरच चार पाय होते,दोन नॉर्मल आणि दोन त्यांच्या पुढे आणि छोटे.तिला नीट चालताच येत नव्हतं.ती चालायचा प्रयत्न करत होती आणि पडत होती.जमलेले सगळे लोक मात्र  हसत होते. अन्वेषला खूप राग आला. कॅमेरा त्या कोंबडीच्या मालकाच्या चेहऱ्यावरआला.“अरे, हा तर आपला इस्माईलचाचा!”

इस्माईल चाचा  म्हणाला,“ये तो अल्लातालाकी देन है,इसकी मै कत्ल नाही करुंगा!

खूप वेळ ते कोंबडीचे चालणे दाखवत होते,तेच ते बोलत होते. अन्वेषला असह्य होऊ लागलं. न रहावून तो बाबांना म्हणाला, “चला बाबा, ते थांबलं पाहिजे.” “अरे,आपण काय करू शकणार आहोत?” बाबा म्हणाले. अन्वेष म्हणाला, “तुम्ही चला,बाबा,काय करता येईल तर पाहू या.”

इस्माईलचाचा आणि बाबांचे संबध खूप चांगले होते.त्यांच्या बँकेने चाचांना व्यवसायासाठी कर्ज दिलं होतं.त्यावेळी बाबांनी त्याना खूप मदत केली होती.

दोघंही स्कूटर वरून इस्माईलचाचाकडे गेले.इस्माईलचाचानी त्यांचं स्वागत केलं.“ आओ,आओ, अन्वेष बेटा.आज यहां कैसे?”

“चाचाजान,ये सब क्या चल रहा था?”अन्वेषने रागानच विचारलं.

“ क्या हुआ, बेटा?” चाचाला काही कळत नव्हतं कशाबद्दल अन्वेष बोलतोय? आणि एवढा का चिडलाय?

“चाचा,ह्या कोंबडीला का दाखवलं जातंय टीव्हीवरून? तिच्या चार पायांमुळे तिला चालता येत नाहीये नीट.तिला त्रास होतोय आणि तुम्ही हसताय काय? तिचा टीव्ही शो करून तिचा insult करताय.”

“अन्वेष,शांत हो बाळा, असं मोठ्या माणसाशी रागानं बोलू नये.” बाबांनी त्याला समजून सांगायचा प्रयत्न केला.

“अन्वेष,बेटा,वो तो बोल भी नाही सकती,उसका insult कैसा?”

“तेच तर चाचा, तिला बोलता येत नाही,म्हणजे तिला काही भावनाच नाहीत का? अहो,तिला किती त्रास होतोय या चार पायांमुळे! तिला बिचारीला किती त्रास होतोय ते आपण तर पाहू शकतो, समजू शकतो. असं प्रदर्शन करताय तुम्ही आणि लोक हसताहेत “

“ते चार पाय तर तिला अल्लाने दिले.त्याला आपण काय करणार?” चाचाला अजूनही काही आपलं काही चुकलंय असं वाटत नव्हतं.

“चाचा, ठीक आहे.ही कोंबडी मला द्या.मी बघतो काय करायचं ते.” अन्वेषने मनाशी काही तरी ठरवलं होतं.

“आपण काय करणार,अन्वेष?” बाबांना काही कळे ना,अन्वेषच्या मनात काय चाललंय ते.

“सांगतो बाबा,फक्त ती कोंबडी घ्या त्यांच्याकडून.” अन्वेषने बाबांना सांगितलं.

त्याचा निश्चय पाहून बाबांनी चाचाला समजावलं.तो अखेरीस तयार झाला.कोंबडी धेऊन अन्वेष आणि बाबा घरी गेले.कोंबडीला त्यांनी खाऊ घातलं तिची नीट व्यवस्थित व्यवस्था केली.

अन्वेषला आठवलं,आपण आणलेल्या पिल्लाला लागलं होतं.तेव्हा प्राण्यांच्या डॉक्टरांकडे त्याला नेलं होतं,त्यांनी त्याला चांगलं बरं केलं होतं. सकाळी उठल्यावर बाबांना म्हणाला,”बाबा,आपण त्या कोंबडीला त्या डॉक्टर काकांकडे घेऊन जाऊ,ज्यांनी जिमीला बरं केलं होतं.”

बाबांनी जुन्या डायरीतून त्यांचा नंबर शोधून काढला,त्यांना फोन केला. त्यांच्या दवाखान्याची जागा बदलली होती, त्यांनी गावापासून लांब मोठी जागा घेऊन प्राण्यांचे हॉस्पिटल काढले होते. त्यांनी कोंबडीला घेऊन यायला सांगितलं.

डॉक्टरांनी तिला तपासलं आणि म्हणाले, “अरे, तिचं operation करावं लागेल.”

“Operation? ते कसलं?” अन्वेष थोडा घाबरला पण त्याला विश्वास होता की डॉक्टर बरोबरच सांगणार.

“हे जे तिचे extra पाय आहेत,ज्यामुळे तिला चालता येत नाही ते काढून टाकावे लागतील.” डॉक्टरांनी समजावलं.

“ह्यामुळे तिच्या जीवाला काही धोका? आणि परत पाय वाढू शकतात का ?” बाबांनी विचारलं.

“खरं तर हे पाय जास्तीचे आहेत,त्यांचा काही उपयोग पण नाही त्यामुळे जीवाला  तसा धोका वाटत नाही.पण शेवटी operation आहे,थोडा फार धोका तर असूच शकतो.”

मग बाबांनी डॉक्टरांकडून सगळं समजून घेतलं. Procedure काय, खर्च किती येईल, नंतर काळजी कशी घ्यायची, किती दिवस लागतील पूर्ण सुधारायला वगैरे. आणि इस्माईल चाचाला फोन करून बोलावून घेतलं. त्याला डॉक्टरांनी आणि बाबांनी सगळं समजावून सांगितलं.शेवटी त्याला समजून चुकलं की ह्यात अल्ल्लातालाची काही मर्जी, कृपा असं काही नाहीये.उलट तिला त्याचा फार त्रास होतोय, त्या त्रासातून तिची मुक्तता आपण केली पाहिजे.आणि तो तयार झाला.

सगळ्या प्रक्रियेत अन्वेष,आई,बाबा सगळेजण चाचाबरोबर होते.नंतर चाचा तिला घेऊन गेला पण जाताना म्हणाला, “अन्वेष बेटा, तूने तो कमाल की. मला उलट पापातून वाचवलंस. मी आता माझ्या कोंबड्यांची खूप काळजी घेईन. त्यांच्यामुळे तर मला पैसा मिळतो आणि मी तिला त्रासात तसाच ठेवत होतो.”

या त्याच्या विचारांचं,कृतीचं आईबाबांना खूप कौतुक वाटलं. त्यांनी त्याला शाबासकी दिली आणि काय बक्षीस हवं आहे असं विचारलं. त्यांना वाटलं होतं की तो आता आपण डॉगी आणू या म्हणेल. पण तो आता मोठा झाला होता. तो म्हणाला,“हे बक्षीस मी राखून ठेवतो,पण जेव्हा मी मागेन तेव्हा मात्र नक्की द्या.” आईबाबांनी लगेच कबूल केलं कारण त्यांना आता अन्वेषबद्दल खात्री होती की इतका समजूतदार झालेला आपला मुलगा काहीतरी चांगलं आणि योग्यच मागेल.

 ( सदर कथा टीव्ही वरच्या बातमीवर आधारित आहे.)

Audio Recording

(Recorded by: Jyoti Gandhe)

ज्योतीG (jyotigandhe28@gmail.com)

टिप्पण्या

  1. संस्काराच् दर्शन जिथे -छान लेख.आम्ही पण ह्युस्टनला हे सर्व अनुभव घेतलेले आहेत.ओघवतं लेखन👍🏻
    चेहरा कविता पण सुंदर.लिहीलेलं सगळं पटतय.
    छोट्यांचा लाॅकडाऊन पण अप्रतिम आणि अमोघचं वाचन पण खूपच झकास👌🏻👏🏻
    समिंदरा,आणि शाबास अन्वेष
    अफलातून आणि मस्त!!
    तुमचे खूप खूप अभिनंदन💐

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा