सांस्कृतिकानुभव कॅलिफोर्नियातला

संस्कारांचे दर्शन जिथे, संस्कृतीचे जतन तिथे हे अनुभवण्यासाठी हा लेख वाचलाच पाहीजे असा ......


सांस्कृतिकानुभव कॅलिफोर्नियातला –

    कॅलिफोर्नियामधला अनुभव आज सगळ्यांबरोबर शेअर करतेय ह्याचा अर्थ असा नाही की तो फक्त तिथेच येतो,किंवा आलेला आहे,तर तो कुठेही येऊ शकतो. जिथे संस्कृती जपली जाते, नुसतीच जपली जाते असं नाही तर अभिमानाने मिरवली जाते तिथे अशा अनुभवातून खूप आनंद मिळतो.हे जे मी सांगते आहे, ते एकाच कालखंडातील आहे असं नाहीये. एकत्रित अनुभवांची गोड शिदोरी आहे असं समजा हवं तर. आजच्या काळात आपली संस्कृती जपणारे, आईवडिलांची खूप काळजी घेणारेही बरेच आहेत, फक्त इथेच नाही तर सातासमुद्रापलीकडेही आहेत त्याचं कौतुक करावसं वाटलं म्हणून हा लेख प्रपंच!

ध्यानीमनी नसताना कॅलिफोर्नियात वास्तव्यास असणाऱ्या उच्च शिक्षित मुलाबरोबर लेकीचा विवाह ठरवला आणि खरं सांगते,लग्न झाल्यावर लेकीच्या तोंडून, आई,मी खूप सुखात आहे.आनंदात आहे,” हे ऐकेपर्यंत जीवात जीव नव्हता.‘मन चिंती ते वैरी न चिंती’. असं म्हणतात न तसं,कोणाला सांगता येत नव्हतं कारण तो निर्णय फक्त एका विवाहोत्सुक मुलीचा नव्हता, तर आधीच एक जावई आलेल्या अनुभवी सासूसासऱ्यांचा होता. प्रामाणिकपणे सांगायचं तर तो ‘सासूचाच’ अधिक होता. कारण मी,माझी धाकटी जाऊ आणि लेकीनीच ‘त्याला’ पाहीला होता लग्नाआधी, आणि त्याच्या वागण्यातला सच्चेपणा जाणवला म्हणून तो निर्णय घेतला होता,तरी एका अर्थानी ती एक लॉटरी होती, आणि आनंदाची गोष्ट म्हणजे त्या लॉटरीने आम्हाला अनमोल बक्षीस मिळाले हे मात्र खरं.

नंतर जे सर्वसाधारणपणे घडतं तसच लेकीच्या बाळंतपणापासून आमच्या तिकडे फेऱ्या सुरु झाल्या आणि आम्ही दरवेळी,‘लेकीकडे जाऊ,तूपरोटी खाऊ’असा आनंद घेऊनच परत आलो आहोत.हा आमचाच नाही तर आम्हाला भेटलेल्या आणि नंतर आमच्याशी मैत्री झालेल्या अनेक आईवडिलांचा, मग ते मुलाचे आईवडील असोत की मुलीचे,सगळ्यांचा आहे, हे अगदी आवर्जून सांगावसं वाटतं. बाळाच्या आगमनासाठी म्हणून गेलो होतो. आणि पहिला कार्यक्रम झाला डोहाळजेवणाचा. म्हणजे तिथल्या भाषेत ‘babyshower’चा. लेकीच्या सासूबाईंनी अगदी सुरेख कागदी कळ्यांची वाडी तयार केली होती. आपल्या पद्धतीचं ओटीभरण घरात केलं. आणि कॉम्प्लेक्सच्या hall मधे जिथे कार्यक्रम आयोजित केला होता,तिथे गेलो. ह्या कार्यक्रमासाठी आपल्याकडच्या सारख्या फक्त बायका नव्हत्या, तर आमंत्रितांची सर्व कुटुंबं उपस्थित होती,सगळ्यांना एकत्र खेळता येतील अशा छान खेळांचं आयोजनही जावई, आणि त्याच्या बहिणीने केलं होतं.खूप मजा आली. आम्ही नुकतेच आणि पहिल्यांदीच अमेरिकेत गेलो असल्याने मनात असणारा परकेपणा ह्या सर्वांमुळे कधी गळून पडला ते आमचं आम्हालाही कळल नाही.

इथे एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की जेव्हा,जेव्हा इथे कोणाकडेही असेच baby shower,गृहप्रवेश, म्हणजे housewarming, वाढदिवस असे कार्यक्रम असत,तेव्हा आवर्जून आमच्यासारख्या सिनिअर पालकांना आमंत्रण दिलं जात होतं, आणि आमच्याकडे व्यवस्थित लक्षही दिलं जात होतं. त्यामुळे तिथे रुळायला आम्हाला खूप सोपं गेलं.

साधारणपणे हवामानाच्या अनुकुलतेनुसार मुलांचे आईवडील हे मार्च नंतर तिथे जातात,आणि नोव्हेंबर पर्यंत परत येतात.त्याचा फायदा असा होतो की आपल्याला आपल्याबरोबरचे मित्र मंडळ मिळते. आपलाही असा एक ग्रुप बनतो. आमचा ही असा ग्रुप बनला,फिरायला जाणं,गप्पा मारणं, एकमेकांकडेही काही काही निमित्तानी जाणं,आपल्या भाषेत अंगतपंगत म्हणजे इथलं ‘potluck’, अगदी सिनेमाला जाणं या सगळ्यात आपण  इथला रहाण्याचा कालावधी अगदी न कंटाळता सहज मजेत काढू शकतो. ह्या सगळयाच्या आयोजनात, कुठे जाण्यासाठी, potluck साठी सामान आणणे वगैरे, सगळीकडे आमच्या मुलांचा सहभाग, उत्साह, प्रेम सतत जाणवत रहायचं. त्यांच्या मित्र मंडळींमधलं bonding मनाला फार दिलासा देत होतं. आपल्या मुलांसमवेत जीवाला जीव देणारी माणसं पाहिल्यामुळे आतून खूप निश्चिंत वाटत रहातं.

तिथल्या रहाण्याच्या कालावधीतच आपले महत्वाचे असे राखीपौर्णिमा, गणपती, नवरात्र, दिवाळी सण येतात. आमच्या जावयाची बहीण पण तिथेच असल्याने राखीपोर्णिमा सणही मस्त साजरा होतो.आपले सण असले की वातावरण असं काही बदलतं की आपण भारतातच आहोत असं वाटतं. गणपती उत्सवही खूप मजेत साजरा केला जातो,आपल्या कुटुंबाच्या प्रथेप्रमाणे उभ्या गौरी सुद्धा मांडून पुरणावरणाचा स्वयंपाक करून मेहूण वगैरे अगदी साग्रसंगीत केलं जातं. अगदी आपल्या इथल्यासारख दर्शनाला, आरतीला, प्रसादाला एकमेकांकडे जाणं, एकत्र अथर्वशीर्ष पठण, अशा उत्साहात आणि आनंदात सण साजरा केला जात असल्याने वातावरण खूप प्रसन्न असतं. नवरात्र,दिवाळीचा उत्साहही असाच अवर्णनीय! काही घरांमधे,गराजच्या भागात नऊ दिवस देवीची स्थापना, पूजा, आरती यांचंही आयोजन होतं, अगदी उपासही करतात काहीजण.आपल्याकडच्या सारखं दांडिया आयोजनही असतंच मोठ्या हॉलमधे. पारंपारिक वेशभूषेतली मुलंमुली इतकी गोड दिसतात,भरपूर खेळतात, मजा येते पहायला सुद्धा. दिवाळी तसा घरगुती,पण एकमेकांकडे फराळासाठी जाणं असतं, आणि हो, फराळाचं ही मिळत तसं. हे सगळं आपल्या पद्धतीनी साजरं करता येतं यात ‘Indian stores’चा खूप मोठा वाटा आहे.

हे असे धार्मिक कार्यक्रम तर छान होतातच पण इतरही कार्यक्रमांचा आस्वाद घेता आला इथे. एका मुक्कामात पहिल्या आंतरराष्ट्रीय ‘विश्वमराठी साहित्य संमेलन’ला उपस्थित राहता आलं. छान कार्यक्रमांच आयोजन होतं. माननीय गंगाधर पानतावणे अध्यक्ष होते,सिंधुताई सपकाळ, अविनाश धर्माधिकारी असे उपस्थित होते, डॉ.सलील कुलकर्णी, संदीप खरे ह्यांचाही कार्यक्रम झाला तेव्हा. त्या कार्यक्रमाच्या वेळी तर मिळणारा प्रतिसाद पाहून मला मी नोकरी करत असलेल्या  चिपळूणच्या माझ्या कॉलेजची आठवण आली. आपण चिपळूणलाच आहोत असंच वाटत होतं त्यावेळी.ह्या कार्यक्रमांमधलं निवेदन अगदी सुंदर मराठीमधून होत असल्याने कार्यक्रमाला एक वेगळीच उंची मिळाली होती.

महेश काळे यांना कोण ओळखत नाही? त्यांचं संगीताबद्दलचं passion त्यांच्या गाण्यातून, एक्सप्रेशन्स मधून,बोलण्यातून ओतप्रोत दिसत असतं. ते तिथे त्यांचे गुरु माननीय पंडित जितेंद्र अभिषेकी आणि त्यांची आईला वंदन करण्यासाठी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम करतात आणि त्यांच्या क्लास मधील प्रत्येकाला गाण्याची संधी देतात,माझी मुलगी काही दिवसच क्लासला जाऊ शकली,पण ती आणि तिच्यासारख्याच काहींनी मिळून ‘पिया की नजरीया’ खूप सुंदर सादर केलं. अगदी सहासात वर्षांच्या मुलांपासून सगळ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केलं. खूप सुंदर तयारीची मुलं आहेत ही.

इथे आम्हाला नाट्यानुभवही खूप छान मिळाला.लहान मुलांची देखील मराठी,इंग्लिश दोन्ही भाषेत नाटकं बसवतात. मोठ्यांच्या एकांकीका बसवतात, आम्ही तिथे असताना वाहन प्रदुषणामुळे घडलेल्या एक खूपच गंभीर घटनेवर आधारित एकांकीका आम्ही पाहिली. थोड्क्यातल्या नेपथ्यासाठी, प्रकाशयोजना, ध्वनीयोजनेसाठी, एकंदरीतच नाटकासाठी इथली मुलं, त्यांचं इंजिनीअरिंग मधलं ज्ञान, कौशल्य पणाला लावतात,खूप मेह्नतीनी,सगळ्यांच्या सहकार्यांनी खूपच उत्कृष्ट प्रयोग सादर करतात. त्या एकांकिकेला, त्या सादरीकरणाला, त्यातल्या अभिनयाला आम्ही  अजून विसरलो नाही आहाेत.

इथे भारतीय भाषांमधील भरपूर पुस्तके असणारी मोठी लायब्ररीसुद्धाआहे. फिरायला जायला अगदी safe रस्ते आहेत, मोठमोठाली पार्क्स आहेत.एकंदरीत तुम्ही इथे छान रमू शकता.

हं,इथे सगळी कामं घरी करावी लागतात.हे खरंय.पण तेवढा आपलेपणा ठेवला,सगळ्यांनी मिळून हसत खेळत,गप्पा मारत,ती केली तर ती पण करूनसुद्धा केल्यासारखी वाटत नाहीत. हे ते तिथेच का इथेही लागू आहे.इथेही वरवरची झाडझूड,फरश्या आणि भांडी वगळता बाकी कामं आपण करतोच न! तसं order करून तिथेही आता आपले बरेच पदार्थ केटरिंग करणाऱ्यांकडून मिळू शकतात.आजकाल उकडीचे मोदकही मिळतात.पोळ्यांना, साफसफाईलाही काम करणाऱ्या मिळू शकतात, पण त्यांचे rates खूप जास्त आणि तासावर असतात.

तिथल्या गोष्टी, उदा. सिंड्रेला, स्नोव्हाईट, लिटीलमर्मेड, मिकीमाउस, Incredibles, अल्लादिन अशा अनेक प्रसिद्ध गोष्टीचं, नाट्य-सिने रुपांतर, अगदी आईसस्केटिंगवरील नाट्य रुपांतर, पपेटस अशा अनेक स्वरूपात पहायला मिळाल्या.आपल्यापेक्षा अगदी वेगळा फेस्टिवल म्हणजे ‘Halloween’ ह्यामध्ये थोडे भयानक, क्रूकेड, अगदी witch सुद्धा, किंवा प्रसिद्ध गोष्टीतल्या charactersचे पोशाख करून धमाल केली जाते. अगदी शाळेतले शिक्षक, ऑफिसमधले बॉसही असे येतात आणि सगळीकडे आनंदाचे, गमतीचे वातावरण असते. थोडक्यात सांगायचा मुद्दा हा,आपल्याकडे इथे भारतात आईवडलांची काळजी घेणारे, आपल्या रूढी परंपरा मनापासून पाळणारे खूप आहेत,त्यांच्या या दृष्टीकोनाचं, वागण्याचं आपण कौतुक करून त्यांच्या पाठीशी उभं रहातो, तसं सातासमुद्रापलीकडेही आपल्या आणि तिथल्या संस्कृतीचा समतोल साधत आपल्या घरादारापासून,आपल्या माणसांपासून लांब आपली मुलं आपली जबाबदारीने आणि आनंदाने रहात आहेत, तिथली आव्हाने मोठ्या कर्तृत्वाने पेलत आहेत ह्याचं ही कौतुक करू या.बरोबर नं?

आपुलकीची,संस्कारांची हिरवळ जिथे,जिथे, मन संतोषले, मन आशा’ वले तिथे,तिथे!

ज्योतीG (jyotigandhe28@gmail.com)

टिप्पण्या

  1. अमेरिकेत आपल्या संस्कृतीचा वारसा जपणारे मराठी लोक आहेत हे बघून खूपच बरं वाटलं. वेगळ्या देशांमध्ये राहताना त्या देशाची भाषा, त्या देशाची रहाणी इतकंच काय त्या देशाचं नागरिकत्व सुद्धा स्वीकारताना आपली भाषा, आपली संस्कृती, आपले आचार-विचार आणि सणवार या पासून आपण दूर जाण्याची आवश्यकता नाही उलट तेथील लोकांना आणि आपल्या मुलांनाही त्यांचा परिचय करून देता आला तर आपली नाळ आपल्या देशाबरोबर व माणसां बरोबर जोडलेली राहील यात शंका नाही . लेखात  व्यक्त झालेला विचार मनाला खूप भावला . लेख खूप छान आहे अशाच अनेक वेगवेगळ्या विषयांवरच्या लेखांची अपेक्षा लेखायतन कडून आहे. - सौ.उज्जवला जतकर

    उत्तर द्याहटवा
  2. उज्ज्वला जातकर यांच्या मताशी मी सहमत आहे. आता नव्याने जी मुले आणि मुली अमेरिकेला जातील त्यांच्या आई - वडिलांना सुद्धा आपली मुले आपल्या संस्कृतीपासून दुरावणार नाहीत असा भरवसा वाटेल.आणि मुलांच्या बाबतीत ते थोडे निश्चिंत होतील. अशा लेखाची खरंच आवश्यकता आहे.अशीच अपेक्षा लेखायतन कडून आम्हाला अपेक्षित आहे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा